नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजारातील माथाडी कामगारांनी ५०किलोपेक्षा जादा वजनाच्या येणाऱ्या मालाची हाताळणी करणार नाही असा पवित्रा घेतला होता. याकरिता वारंवार आंदोलने करण्यात आली होती. त्यावर महाराष्ट्र शासनाचे ५० किलो पेक्षा भार असलेल्या गोणी न वाहू देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरीदेखील ५० किलोपेकक्षा अधिक वजनाच्या गोणी येत असून कामगार संघटनांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे एपीएमसीने नुकतेच परिपत्रक काढून या निर्णयाची कठोरपणे अमंलबजावणी करण्याचे आडत व्यापार्यांना आदेश दिले आहेत.
जानेवारी २०२० मध्ये केंद्र शासनाने ५०किलो पेक्षा अधिक वजनाच्या गोणी नसाव्यात असा आदेश दिला होता.तर एपीएमसी प्रशासनाने नोव्हेंबर २०२०पासून याची अंमलबजावणी करणे गरजेचे होते. मात्र हा निर्णय अंमलात येत नसल्याने वारंवार माथाडी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते. तुर्भे बाजार समितीचे सहा सचिव बी.जी.टाव्हरे यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात ९जून २०२३ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने शासनाच्या मालाच्या गोणीच्या वजन मर्यादेबाबतचा आदेश व कामगारांचे आरोग्याचे हित लक्षात घेता कांदा-बटाटा मालाची ५० किलो इतक्याच माल वाहक क्षमते विषयी मर्यादा ठेवण्याचे सूचित केले आहे. या बाबत व्यापारी संघटनेच्या सभासद आडत व्यापार्यांना माहिती देऊन ५० किलो माल वाहक क्षमतेबाबत अमंलबजावणी प्रभावीपणे राबविण्याचे म्हटले आहे. या बाबत योग्य कारवाई न झाल्यास माथाडी संघटनेचे माथाडी व वारणा कामगार यांनी कांदा-बटाटा आवारात कामबंद केल्यास संघटनेला जबाबदार धरणार असल्याचे म्हटले आहे.