प्रतिकूल वातावरणामुळे यंदा हापूस आंब्याचे उत्पन्न घटणार असे दिसून येत असतानाच मागील काही दिवस घाऊक बाजारात आंब्याची मागणी आणि पुरवठा यांचा समतोल ढासळला आहे.
तुर्भे येथील घाऊक फळ बाजारात हापूस आंब्यांच्या दिवसाला केवळ दीडशे ते अठराशे पेटय़ा येत आहेत. या प्रमाणात स्थानिक किरकोळ विक्रेत्यांची संख्या मात्र जास्त आहे. त्यामुळे हापूस आंब्याचे दर चढे राहत आहेत. सध्या ५०० ते १२०० रुपये प्रति डझन हापूस आंबा विकला जात आहे. बाजारात येणाऱ्या एकूण हापूस आंब्यातील ३० टक्के आंबा निर्यात होत असल्याने ही दरवाढ पुढील महिन्यापर्यंत कायम राहणार असून आखाती देशातील निर्यात वाढू लागली आहे.
कोकणातील हापूस आंब्याचे प्रमाण मागील महिन्यात वाढले असताना गेली काही दिवस पडलेली थंडी हापूस आंब्याला मारक ठरू लागली आहे. त्यात घाऊक बाजारात आवक घटल्याने आंब्याचे दर कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. हापूस आंब्याचे गणित मागणी तसा पुरवठय़ावर अवलंबून नाही. त्यामुळे कोकणातून येईल तेवढा हापूस विकणे इतकेच व्यापाऱ्यांच्या हातात आहे. सध्या बाजारात केवळ दीड ते १८०० पेटय़ा हापूस येत असल्याने अनेक गिऱ्हाईकांना हात हलवत माघारी जावे लागत आहे.
मुंबईत डोक्यावर पेटय़ा घेऊन हापूस विकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बाजारात आंबाच कमी येत असल्याने या किरकोळ विक्रेत्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

गुढीपाडव्यानंतर चित्र बदलेल
कमी आवक असल्याचे चित्र एप्रिल महिन्यात बदलण्याची शक्यता असून गुढीपाडव्यानंतर ही आवक वाढण्याची शक्यता आंबा व्यापारी संजय पानसरे यांनी व्यक्त केली. कोकणात काही भागात आजही थंडी चांगली पडत असल्याने हापूस आंब्याच्या फळधारणेवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. थंडीमुळे फळधारणा गळून पडू लागली असल्याने आवक कमी झाली आहे. सर्वसाधारणपणे होळीनंतर हे चित्र बदलणार असून एप्रिल महिन्यात आवक वाढल्यानंतर हापूस आंबा दराच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकणार आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते.