लोकसत्ता टीम
नवी मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात सातत्याने होणारे बदल यामुळे आपल्या अवीट गोडीने सातासमुद्रापल्याड एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या हापुसची चव अलिकडे आंबट झाली आहे. चार पैसे मिळवून देणारा फळ म्हणून हापूसकडे पाहिले जाते मात्र हाच हापुस निसर्गाची अवकृपा या संकटात सापडल्याने त्याचा उत्पादनावर अधिक परिणाम होत आहे. हवामान बदल, ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याने यंदा उत्पादनात अधिक घट झाली आहे. यंदा अवघे १६% ते २८% उत्पादन असून मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी उत्पादन आहे.
एपीएमसीत फळ बाजारात एप्रिल-मे महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कोकणातील हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु यंदा उलट परिस्तिथी असून ऐन हंगामात केवळ १८ हजार ते २० हजार पेट्या दाखल होत आहेत. कोकणात दोन ते तीन वेळा मोहोर आला यामुळे मोठया प्रमाणात फळधारणा झाली नाही. मोहोर संवर्धानात अडथळा व त्याचवेळी वातावरणात झालेल्या बदलांमुळे किड रोगांचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव या सर्वांचा परिणाम आंब्याचे खास करुन हापूस आंब्याचे उत्पादन घटण्यावर झाला. मार्चमध्ये अवकाळी पावसाच्या भीतीने वेळेआधीच आंबे तोडणी केल्यामुळे, कोकणातील सर्वच विभागातून एकाच वेळी हापूस दाखल झाल्याने मार्च मध्ये ३- ४ पटीने आवक वाढली.
अवकाळी पावसाने आंबेगळही झाली असल्याने मे महिन्यांत कमी प्रमाणात हापूस दाखल होत आहे. रायगड मधील आंब्याची झाडे तीन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रिवादळाने जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. कारण वादळामुळे अनेक झाडेही कमजोर बनली आहेत. १५ मे नंतर बाजारात हापूस आवक वाढेल, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत प्रमाण कमीच असेल. त्यातही हवामान आणि पावसावर गणित अवलंबून आहे, असे मत बागयदार यांच्याकडून व्यक्त होत आहे.
हापुसला एपीएमसीत चांगला दर मिळेल का?
एपीएमसी बाजारात सध्या हापूस कमी प्रमाणात दाखल होत आहे. उर्वरित राहिलेल्या उत्पादनाला उभारी देण्यासाठी बागयदार यांच्याकडून औषध फवारणीसाठी अधिक खर्च केला जात आहे. १५ मे नंतर रायगड जिल्हयात दुसऱ्या भराचा आंबा मंडईत दाखल होईल.मात्र एपीएमसीत येणाऱ्या हापूसला अपेक्षित दर मिळेल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. एपीएमसी मध्ये मोठया प्रमाणात कर्नाटकी आंबा दाखल होत असून हा आंबा दिसायला हापूससारखाच असल्याने हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत आहे. कारण हे आंबे कोकण हापूसच्या तुलनेत फारच स्वस्त आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत हापुसला चांगला दर मिळेला का ? असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आणखी वाचा- खोदलेले रस्ते नवी मुंबईकरासाठी डोकेदुखी, पावसाळ्यापूर्वी अनेक कामे पूर्ण करणार
यावर्षी कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन मोठया प्रमाणात घटून अवघे १६ ते १८ टक्यावर आले आहे. मागील ६ वर्षात सर्वांत कमी उत्पादनाचे हे वर्ष ठरत आहे. जागतिक हवामान बदलाचा फटका तापमान वृध्दी, अवकाळी अतिवृष्टी, आभ्राच्छादित वातावरण यामुळे यावर्षी उत्पादनात घट झाली आहे. -चंद्रकांत मोकल, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ