आवक घटली; बागायतदारांना फटका
पूनम धनावडे, नवी मुंबई
गुडीपाडव्यानंतर एपीएमसी बाजारात मोठय़ा प्रमाणात हापूस दाखल होतो. दर वर्षी एप्रिलमध्ये ८४ ते ८५ हजार पेटय़ा हापूस दाखल होत असतो. यंदा मात्र ४० ते ४५ हजार पेटय़ाच आवक होत आहे. ही आवक निम्म्यावर आली आहे. पुढील कालावधीत ही आवक जास्तीत जास्त ६० ते ६५ हजार पेटय़ांची मजल मारेल, असे घाऊक व्यापारी संजय पिंपळे यांनी सांगितले.
सुरुवातीला थंडीमुळे रात्री दव पडल्याने आंबा देठाला काळवंडला. त्यानंतर आता कडाक्याच्या उन्हाने ‘थ्रीप्स’ रोगाच्या प्रादुर्भावाने मोहर गळून गेला.. या नैसर्गिक संकटामुळे या वर्षी एक एकर लागवडीसाठी २५ हजार खर्च करून १ लाख उत्पन्न अपेक्षित असताना यंदा ४० हजारांपर्यंतच हातात मिळणार असल्याचे बागयतदारांनी सांगितले.
यंदा एपीएमसी बाजारात कोकणातील हापूस लवकर दाखल झाला होता. त्यामुळे पुढील कालावधीत सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा होती; परंतु हवामान बदलाचा फटका बसून बागायतदार यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यंदा पिकाला जितका खर्च तितकेच उत्पन्न मिळण्याची अपेक्षा बागायतदार करीत आहेत.
सध्या एपीएमसी बाजारात फक्त २ टक्के हापूस ४ ते ६ डझन ३ हजार ५०० रुपयांनी विकला जात आहे, तर उर्वरित हापूस ७०० ते ३ हजार रुपये आहे. यामध्ये ८० टक्के माल लहान येत आहे.
एप्रिलमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून येणारा बदामी, तोतापुरी आंबा दाखल होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे हापूसचे दर कोसळतील. मार्चपर्यंत उत्पन्न कमी व कमी प्रतीचा माल यामुळे चांगला दर मिळाला नाही. आता इतर आंबे आल्यानंतर दर कमी होतील. त्यामुळे यंदा हापूस आर्थिक कचाटय़ात सापडला आहे.
वार्षिक आवक निम्म्यावर
एपीएमसी बाजारात फेब्रुवारी ते जूनपर्यंत कोकणातील हापूस दाखल होत असतो. सध्या बाजारात ५० टक्के हापूस दाखल होत आहे. दरवर्षी एपीएमसीमध्ये संपूर्ण हंगामात एकूण दीड कोटीहून अधिक पेटय़ा दाखल होत असतात. यंदा वार्षिक आवक ७५ लाख पेटय़ांपर्यंत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र आंबा उत्पादक महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली. मागील वर्षी १ कोटी ३० लाख पेटय़ांची नोंद झाली होती.
खर्च वाढला; उत्पादनही कमी
औषधे, कीटकनाशके फवारणीवर यंदा खर्च वाढला आहे. दरवर्षी ८ फवारणी कराव्या लागत होत्या. यंदा १० फवारणी कराव्या लागल्या. जिथे ५०० पेटय़ा आंबा उत्पादन निघेल अशी आशा असताना अवघ्या १५० पेटय़ा उत्पादन मिळत आहे.
या वर्षी रोगराई व वातावरण बदलाने हापूस उत्पादन घटले आहे. ‘थ्रीप्स’ने मोहर गळून पडला आहे. यंदा औषधे, कीटकनाशके फवारणीवर ७० ते ८० हजार खर्च झाला आहे. दीड ते दोन लाख खर्च झाला असून यंदा उत्पन्नदेखील तेवढेच मिळेल अशी आशा आहे.
– के.डी. आंगचेकर, बागायतदार, वेंगुर्ला