सतत बदलणाऱ्या हवामानामुळे कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन यंदा घटण्याची भीती निर्माण झालेली असताना हापूस आंब्याची आवक मागील काही दिवसांत वाढली आहे. त्यामुळे दुबईतील निर्यातीत वाढ झाली आहे. कोकणातील विविध प्रांतांतून सध्या दररोज एक हजार पेटय़ांपेक्षा जास्त हापूस आंबा मुंबईतील घाऊक बाजारात येऊ लागला असून त्यातील २० टक्के हापूस आखाती देशात निर्यात केला जात आहे.
हापूस आंब्याच्या फळधारणेसाठी थंडी चांगली मानली जात असली तरी थंडीचा अधिक काळ हापूस आंब्यांसाठी धोकादायक मानला जात आहे. थंडी काळात येणारा नवीन मोहर हा फळधारणेला कमकुवत बनवणारा मानला जात असल्याने कोकणात सध्या पडणारी थंडी आंबा बागायतदारांना त्रासदायक वाटू लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या फळधारणेचा माल जानेवारी महिन्यात आला असून नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत आलेल्या मोहराला फळधारणा होऊन हा माल सध्या बाजारात येत आहे. पुढील दोन महिने होणारी फळधारणा ही मे महिन्याअखेपर्यंत हापूस आंबा बाजारात पाठविण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने बाजारात येणाऱ्या हापूस आंब्याची या आठवडय़ात अचानक आवक वाढली असून ती दिवसाला १००० ते १२०० पेटय़ा दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे गुढीपाडव्यानंतर हापूस आंबा बाजारात पाठविण्याची पद्धत प्रचलित होती, मात्र स्पर्धेमुळे हापूस आंबा जानेवारी महिन्यातच बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ातच हापूस आंब्याची आवक वाढली आहे. कोकणातून येणाऱ्या एका पेटीत फळाच्या आकाराप्रमाणे चार ते पाच डझन हापूस आंबा ठेवला जात आहे. तुर्भे येथील मुंबईच्या घाऊक बाजारात ही आवक वाढल्याने यातील चांगल्या फळाची छाननी करून तो आखाती देशात पाठविण्यास सुरुवात झाली आहे. हापूस आंब्याची सर्वाधिक मोठी बाजारपेठ ही आखाती देश असल्याने हापूस आंब्याच्या निर्यातीकडे लक्ष लागले असल्याचे दिसून येते. कोकणातून येणाऱ्या एकूण हापूस आंब्यांपैकी वीस ते तीस टक्के हापूस आंबा हा केवळ आखाती देशात निर्यात होत असल्याचे निर्यातदार मोहन डोंगरे यांनी स्पष्ट केले. यानंतर आशियाई देशांतील सिंगापूर, मलेशिया, थायलंड याबरोबरच नंतर इंग्लंड, न्यूझीलंड, युरोपमध्ये हापूस आंबा पाठविला जातो. गतवर्षीपासून अमेरिकन नागरिकांनीही हापूस आंब्याला पसंती दिली असून या देशात हापूस आंबा पाठविताना अनेक किरणोत्सार करून र्निजतुकीकरण करावे लागत असल्याने त्या ठिकाणी हापूस थोडय़ा उशिराने पाठविला जाणार आहे.
हापूसचा परदेश दौरा सुरू
मुंबईतील घाऊक बाजारात येऊ लागला असून त्यातील २० टक्के हापूस आखाती देशात निर्यात केला जात आहे.
Written by विकास महाडिक
आणखी वाचा
First published on: 05-02-2016 at 02:32 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alphonso mango start overseas tour