कोकणातून मुंबई बाजारपेठेत येणाऱ्या हापूस आंब्यावर निर्यातीसाठी लागणारी किरणोत्सार प्रक्रिया आता नवी मुंबईत होऊ लागल्याने शुक्रवारी १२०० किलो हापूस अमेरिकेकडे रवाना करण्यात आला. राजापूर येथील आंबा बागायतदार गजानन शेटय़े यांच्या बागेतील उत्तम प्रतीचा हापूस एपीएमसी फळ बाजारातील निर्यातदार प्रकाशभाई ठक्कर यांच्या माध्यमातून किरणोत्सारी प्रक्रिया करू पाठविण्यात आला. अमेरिकेत त्याच्यावर पसंतीची मोहर उमटली की नंतर कोणत्याही देशाच्या कानाकोपऱ्यात हापूस पाठविणे शक्य होणार आहे. यापूर्वी या आंब्यावर लासलगाव, नाशिक येथील किरणोत्सार केंद्रात प्रक्रिया करून अमेरिका, युरोपमध्ये पाठविला जात होता.
गुढीपाडव्यानंतर कोकणातील हापूसची आवक वाढली आहे. आता चांगल्या प्रतीच्या आंब्याच्या निर्यातीवर भर दिला जात आहे. जागतिक फळ मानांकनानुसार अमेरिका, युरोपमध्ये आंबा पाठविणे मोठे जिकिरीचे मानले जाते. दोन वर्षांपूर्वी आंबा व पाच भाज्यांमध्ये फळमाशा आढळून आल्याने युरोपीय महासंघाने आंब्याला प्रवेशबंदी केली होती. फळ आणि भाज्यांवर सर्व प्रकारच्या उष्ण जल, अति उष्ण तापमान आणि किरणोत्सार प्रक्रिया केल्यानंतर त्यांची निर्यात केली जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिल्यानंतर युरोपने बंदी घातलेल्या फळांना व भाज्यांना परवानगी दिली आहे. मात्र अमेरिकेला हवी असलेली किरणोत्सार प्रक्रिया करण्यासाठी निर्यातदारांना अगोदर हापूसची नाशिकवारी करावी लागत होती. त्यामुळे मुळे निर्यातदारांना जादा वाहतूक खर्च सोसावा लागत होता. किरणोत्सार प्रक्रिया यापूर्वी २५ रुपये प्रती किलोने होती. ती आता १३५ रुपये करण्यात आली आहे. शेतीमाल निर्यातीला सरकारने चालना देण्याची गरज आहे, पण तसे होत नाही. पण अमेरिकी नागरिक खऱ्या अर्थाने हापूसची मोठय़ा प्रमाणात चव घेतील त्या दिवशी निर्यात केल्याचे समाधान मिळेल. केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे के. बी. एक्स्पोर्टच्या प्रकाश ठक्कर यांनी सांगितले.