घाऊक बाजारात ४ ते ६ डझन आंब्यांची पेटी ५०० ते २५०० रुपयांना

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई वाशीतील कृषी उत्पन्न बाजारात सोमवारपासून हापूसची आवक वाढली असून बाजारभाव उतरले आहेत. वातावरणातील उष्णता वाढल्याने आंब्याची तोडणी लवकर केली जात आहे. घाऊक बाजारात रोज ७० ते ८० हजार पेटय़ा दाखल होत आहेत. त्यामुळे भावही कमी झाले असून ५०० ते अडीच हजार रुपयांना चार ते सहा डझन हापूसची पेटी उपलब्ध आहे.

यंदा हवामान बदलाचा फटका बसल्याने हापूसचे उत्पादन घटले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक निम्म्यावर आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपासून हवामानात उष्णता वाढत आहे. हापूसला जादा उन्हाचा तडाखा बसत असल्याने कोकणातील बागायतदार आता आंबा तोडणीवर भर देत आहेत.

नेहमी बाजारात ४० ते ४५ हजार पेटय़ांची आवक होते, मात्र सोमवारपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजारात ८० ते ८५ हजार पेटय़ा दाखल झाल्या. मंगळवारी ८० हजार पेटय़ांची आवक झाली, असे घाऊक व्यापारी संजय पिंपळे यांनी सांगितले.

एपीएमसी बाजारातील आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. ७०० ते ३ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असलेली ४ ते ६ डझन

आंब्यांची पेटी आता ५०० ते अडीच हजार रुपयांना विकली जात आहे. मात्र, आवक वाढली असली तरी दर्जा खालावल्यामुळे मागणीही कमी आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alphonso mangoes price rate fall due to the heat