विकास महाडिक
नवी मुंबई : सिडकोने महामुंबई व नैना क्षेत्रासाठी भविष्यात लागणाऱ्या पाण्यासाठी कोंढाणे, बाळगंगा, हेटवणे (अतिरिक्त) या धरणांचे पर्याय उपलब्ध केलेले असताना नवी मुंबई पालिकेने नवीन पाण्याचे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. बेलापूरपासून ९५ किलोमीटर लांब असलेल्या कोलाडच्या किनारावरील अंबा व कुंडलिका नदीतील जल विद्युत प्रकल्पातील विसर्गाचे पाणी नवी मुंबईपर्यंत आणण्याची तयारी सुरू केली आहे.
नवी मुंबईची लोकसंख्या सध्या १७ लाख ६० हजार असून २०३८ पर्यंत ती ४२ लाखांच्या घरात जाणार आहे. त्यासाठी हा नवीन पाण्याचा आराखडा तयार केला जात आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रासाठी खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मोरबे धरणातील ४५० दशलक्ष लिटर पाणी दररोज पुरवठा केला जात आहे. या पाण्याव्यतिरिक्त एमआयडीसी नागरी क्षेत्रासाठी पालिका बारवी धरणातील ४५ दशलक्ष लिटर पाणी विकत घेत आहे. हे पाणी कमी-जास्त केले जात असून उन्हाळय़ात या क्षेत्रातील नागरी वसाहतीला पाण्याचा तुटवडा भासत असल्याच्या तक्रारी आहेत.

नवी मुंबई पालिकेची लोकसंख्या १८ लाखांच्या घरात गेली आहे. सिडकोच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकासाठी तसेच काही अल्प उत्पन्न गटासाठी घरे बांधली जात आहे. खासगी विकासकांनीही सिडको भूखंड विकत घेऊन आलिशान घरे बांधण्याचा सपाटा लावला आहे. सिडको निर्मिती धोकादायक व तीस वर्षे जुन्या इमारतींची पुनर्बाधणी वाशी, नेरुळ, घणसोली या नोडमध्ये सुरू झाली आहे. वीसपेक्षा जास्त प्रकल्पांना पालिकेने बांधकाम परवानगी दिली आहे. पाच वर्षांपूर्वी सरकारने केवळ अडीच वाढीव चटई निर्देशांक मंजूर केला होता, पण अलीकडे दोन वर्षांपूर्वी सरकारने राज्यातील काही मोठय़ा शहरांसाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केल्याने शहरात पाच ते सहा वाढीव एफएसआयने जुन्या इमारतींची पुनर्बाधणी होत आहे.

शहरातील २९ गावांच्या आजूबाजूला बेकायदा बांधकामे आजही बिनबोभाट उभी राहात आहेत, तर एमआयडीसीतील ४९ झोपडपट्टय़ा लवकरच झोपू योजनेअंतर्गत कात टाकणार आहेत. याशिवाय जुन्या कारखान्यांच्या जागी निवासी घरांना सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईची लोकसंख्या झपाटय़ाने वाढणार आहे. रेल्वे, मेट्रो, विमानतळ या वाहतूक साधनामुळे ही संख्या नियमित लोकसंख्येपेक्षा जास्त असणार आहे. या वाढत्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी सिडको आणि पालिका एकाच वेळी जल आराखडा तयार करीत असून पालिका प्रशासनाने यात एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई पालिका सध्या ४५० दशलक्ष लिटर पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करीत असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येसाठी
आणखी ४०० दशलक्ष लिटर पाणी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी पालिकेने ठाणे, रायगड जिल्ह्यातील पाणीस्रोतांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.रायगडमध्ये पाणीस्रोताची जास्त उपलब्धता असल्याने जलसंपदा विभागाने सहा धरणांची उभारणी यापूर्वीच केला आहे. मोरबे धरणाच्या परिसराला पाणी साठवणाची मर्यादा असल्याने हे धरण ४५० दशलक्ष लीटर पेक्षा जास्त दैनंदिन साठवण करू शकणार नाही असा अहवाल आहे. माथेरानच्या डोंगर कपारीतून धावरी नदीवाटे येणाऱ्या पाण्याला मर्यादा आहेत. मोरबे धरणाची उंची वाढवूनदेखीलही साठवण पूर्ण होणार नाही. त्यामुळे पालिकेने नवीन पाण्याचा शोध घेताना थेट बेलापूर पासून ९५ किलोमीटर लांब असलेल्या कुंडलिका व अंबा नदीच्या पात्रामधील पाण्यावर दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी रायगड जलसंपदा विभाग कोलाड यांना या पाण्याची उचल करता येईल का याची चाचपणी करण्याची विनंती केली आहे.

कुंडलिकामधून ९९४ दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याची तयारी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात १९२७ मध्ये टाटा पॉवर कंपनीने हा भिरा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पातून पाहिल्यांदा ३०० मेगावॉट वीज निर्माण केली जात होती. टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात आलेली आहे. विद्युत निर्मितीनंतर पाण्याचा विसर्ग हा कुंडलिका व अंबा नदीच्या पात्रात सोडला जात आहे. या पाण्याचा उपसा करून ते नवी मुंबईपर्यंत आणण्याची पालिकेची योजना आहे. कुंडलिका नदीतील पाणी जलसंपदाच्या एका अहवालानुसार २,२८७ दशलक्ष घनमीटर इतके आहे. त्यातील ९९४ दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याची तयारी पालिका करीत आहे. हे पाणी नवी मुंबईपर्यंत आणले गेल्यास नवी मुंबई पाण्याबाबत पुन्हा एकदा स्वयंपूर्ण होणार आहे.

नवी मुंबईची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्या प्रमाणात या शहराला पाण्याची नितांत गरज भासणार आहे. पालिकेच्या मोरबे धरणाला मर्यादा असल्याने इतर स्त्रोत्र शोधले जात आहेत. त्यापैकी अंबा व कुंडलिका नदीतील विर्सग पाण्याचा विचार केला जात आहे. अशाच प्रकारे इतर स्त्रोत्राची चाचपणी केली जात आहे. नवी मुंबईतील भविष्यात कमीत कमी ८५० दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. त्याचा जल आराखडा तयार केला जात आहे. त्यातील हा एक पर्याय आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई पालिका