नवी मुंबई : जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी देण्यात आला . हा सोहळा खारघर येथे झाल्यानंतर सुमारे १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता.या घटनेला कोण जबाबदार आहे ?याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून सातत्याने केली जात आहे.या कार्यक्रमाची उच्च स्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी उध्दव ठाकरे आग्रही आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही नवी मुंबई शहरातील शिवसेना नेत्यांना घेवून राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेवून निवेदन सादर केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नवी मुंबई शहरात येवून ही मागणी केली.महाराष्ट्र भुषण कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची सीबीडी बेलापूर येथे आयुक्तालयात येथे भेट घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
खारघर येथील घटना ही मानव निर्मित आपत्ती असल्याने राज्य सरकार सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न करीत आहे.असा आरोपही करण्यात आला. यासाठी सदर प्रकरणी चौकशी करून संबंधित दोषींविरुध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली.
खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानीत करण्याचा कार्यक्रमात उष्माघात व चेंगराचेंगरीमुळे १४ श्री सदस्यांना जीव गमवावा लागला होता.मात्र सरकारने या दुर्दैवी घटनेनंतर कोणतीही भूमिका अथवा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. सरकारने जारी केलेल्या आकड्यांबाबत आजही संभ्रम कायम आहे. अद्याप स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अपमृत्यूची नोंद झाली नाही. याबाबत दानवे यांनी खंत व्यक्त केली.
सदर घटनेला जबाबदार ठरलेल्या व नियोजनात निष्काळजीपणा करणाऱ्या स्थानिक वरिष्ठ पोलीसांवरही किमान कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील आयुक्तांकडे करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेनवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, रायगड जिल्हा संपर्कनेते बबन पाटील, आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.