तांत्रिक अडचणी मार्चअखेपर्यंत दूर करण्याचे आदेश; मुख्य सभागृह, खुला सभामंडप, प्रार्थनागृहाचा समावेश

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐरोली सेक्टर १५ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या घुमटाला संगमरवर लावण्याऐवजी पांढरा रंग देण्याच्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयावरून शहरात महापौर विरुद्ध आयुक्त असा सामना गेले १० महिने सुरू असतानाच प्रशासनाने या वास्तूचे लोकार्पण १४ एप्रिलला करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. ४० मीटर उंचीच्या घुमटाला संगमरवर लावणे योग्य नसल्याने त्याऐवजी तेथे रंग देण्यात येणार आहे. केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनीही यासंदर्भात आयुक्तांचा निषेध केला होता.

नवी मुंबईत राष्ट्रपुरुषांची स्मारके व्हावीत यासाठी पालिकेने सिडकोकडून काही भूखंडांची मागणी केली आहे. त्यात ऐरोली सेक्टर १५ येथील भूखंड क्रमांक २२ अ चा समावेश आहे. हा भूखंड वाणिज्यिक वापराचा असल्याने सिडकोने विक्रीला काढला होता, पण पालिकेने नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे यासाठी हा भूखंड पदरात पाडून घेतला. अडीच एकरांच्या या भूखंडावर ६ एप्रिल २०११ रोजी या स्मारकाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी सर्वप्रथम १७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुख्य सभागृह, खुला सभामंडप आणि प्रार्थनागृह अशी रचना असून त्यात आता कलादालन, ग्रंथालय, कॅफेटेरीया आणि बाहेर असलेल्या विद्युत जनित्राच्या जागी हिरवळ तयार करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी १८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

या संपूर्ण स्मारकाचे काम दोन वर्षांत करण्याचे आश्वासन पालिकेने रहिवाशांना दिले होते. गेली चार वर्षे या स्मारकाच्या लोकार्पणासाठी अनेक मुहूर्त ठरवण्यात आले. चार वर्षे काम रखडल्याने या स्मारकाच्या खर्चात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे पालिकेने नंतर २५ कोटी ८२ लाख रुपये अधिक  खर्चाला मंजुरी दिली. यात स्मारकाच्या मधोमध उभारण्यात येणाऱ्या घुमटाला मखराणा मार्बल बसविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा संगमरवरी दगड कालांतराने काळा पडण्याची शक्यता आयआयटीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली. जवळच ठाणे खाडी आणि अरबी समुद्र असल्याने ही शक्यता जास्त असल्याचे या तज्ज्ञांचे मत आहे. मे २०१६ मध्ये तुकाराम मुंढे यांनी पालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. संगमरवराऐवजी पांढरा रंग मारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. तेव्हापासून महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त मुंढे यांच्यात वादाला तोंड फुटले आहे. त्या वादाने आता पुन्हा जोर धरला असून केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांनीही संगमरवर बसवण्यास विरोध करणाऱ्या आयुक्तांना हटविण्यासाठी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना उद्युक्त केले आहे.

त्यामुळे मुंढे यांच्या विरोधात सध्या शहरात आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी प्रशासनाने १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीला हे स्मारक लोकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मार्चअखेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.

ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम गेली चार वर्षे रखडले आहे. ४० मीटर उंचीच्या घुमटाचे काम अत्यंत क्लिष्ट असल्याने अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मार्चअखेपर्यंत सर्व काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहराच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या या स्मारकाचे लवकरात लवकर लोकार्पण व्हावे यासाठी प्रशासनानेच प्रयत्न सुरू आहेत.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambedkar bhavan in airoli inauguration on april