लोकसत्ता टीम
पनवेल: रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून मुंबई व उपनगरांमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मुंबई गोवा महामार्गाची सुरुवात होणाऱ्या पळस्पे फाटा येथील पदयात्रेत एकवटण्यास सुरुवात झाली. मनसे खड्यांच्या निमित्ताने कोकणी माणसाला साद घालण्याचा प्रयत्न करीत आहे.
मनसेचे नेते अमित ठाकरे हे स्वतः या पदयात्रेचे नेतृत्व करत असून ते पळस्पे येथील जय मल्हार या हॉटेलमध्ये सकाळी सहा वाजता येऊन थांबले. अर्धा तासाने ठाकरे पळस्पे येथील मनसैनिकांसोबत पदयात्रा सुरु होण्याच्या पळस्पे येथे पोहचले. सकाळपासून रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने मनसेची ही जागर पदयात्रा पावसातून काढावी लागली आहे. सुमारे १० बसभरुन मनसैनिक पळस्पे फाटा येथे जमा झाले होते. ३०० पोलीसांचा बंदोबस्त येथे लावण्यात आला आहे. दोन रुग्णवाहिका त्यामध्ये डॉक्टर आणि एक अग्निशमन बंब अशी व्यवस्था पोलिसांनी केली आहे.
आणखी वाचा-सीबीआय चौकशीला कंटाळून सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या
पदयात्रेपूर्वीच अमित ठाकरे यांच्या अंगरक्षकाला भोवळ आली होती. त्यांना तातडीने उपचार देण्यात आले. कोकणी पद्धतीने गाऱ्हाणे घालून पदयात्रेला सुरुवात झाली. मनसैनिकांनी पळस्पे फाटा येथे घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता.