पनवेल: करंजाडे वसाहतीमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असल्याने अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना गणेशोत्सवात पाण्याचे टॅंकर मागवावे लागतात. पाणी टंचाईमुळे वसाहतीमध्ये पाणी टॅंकर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त टॅंकर पाण्याचे पोहचविल्यास चांगला नफा मिळतो. त्यामुळे टॅंकरचालकांची स्पर्धा लागली आहे. याच स्पर्धेत एका १८ वर्षीय तरुणी पाण्याच्या टॅंकरच्या चाकाखाली येऊन ठार झाली आहे. ही घटना बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजता वडघर खाडीपुलावर घडली.
प्राची वानखेडे असे या मृत तरुणीचे नाव आहे. करंजाडे वसाहतीमधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या मागणीमुळे रात्रभर पाण्याने भरलेले टॅंकर भरधाव वेगात पनवेल शहर ते वसाहतीच्या अंतर्गत मार्गावर धावत असतात. अशाच एका टॅंकरने बुधवारी रात्री प्राची वानखेडे हीला मागच्या चाकाखाली चिरडले.
हेही वाचा… कळंबोलीतील कपास महामंडळ गोदामालगत अवजड वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे परिसरात वाहतूक कोंडी
प्राची कामावरुन घरी परतत असताना तीला उशीर झाला. गणेशोत्सवाचे दिवस असल्याने तीला घरी लवकर पोहचायचे होते. तीचा सहकारी अनिकेत ठाकूर हा प्राची हीला दुचाकीवरुन घरी घेऊन जात असताना प्रवासादरम्यान घटना घडली. टॅंकर चालक अपघात झाल्यानंतर तेथून पसार झाला. पनवेल शहर पोलीस ठाण्यात संबंधित टॅंकरचालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोलीस टॅंकरचालकाचा शोध घेत आहेत.