शेखर हंप्रस

वाशी विभागात गेल्या पाच वर्षांत अग्निशमन दलाची सुसज्ज इमारत व नवी मुंबईचे सांस्कृतिक केंद्र विष्णुदास भावे नाटय़गृहाचे सुशोभीकरण यांसारखी महत्त्वपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याचे समाधान असले तरी पार्किंग धोरण व फेरीवाला धोरण आणण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याने वाहतूक कोंडीची समस्या मात्र आहे तशीच असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रभाग ६१ मधील सिडकोकालीन घरांचा पुनर्विकास रखडल्याने येथील रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत.

प्रभाग क्रमांक ६१, ६२, ६३, ६४ आणि ६५ या पाचही प्रभागांत वाहतूक कोंडी ही मुख्य समस्या झाली आहे. पालिका प्रशासनाचे नियोजन नसल्याने हा त्रास सहन करावा लागत असल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत.

या प्रभागांतील बहुउद्देशीय इमारतीचे कामही प्रगतिपथावर आहे. वाशी स्टेशन परिसरात ‘डक’चे काम पूर्णत्वास आले असून या कामामुळे फायबर ऑप्टीकसाठी वारंवार होणारी रस्ता खोदाई होणार नाही. याशिवाय मीनाताई ठाकरे उद्यानाचे (सेक्टर १० ए) सुशोभीकरण करण्यात आले आहे. ही महत्त्वाची कामे गेल्या पाच वर्षांत झाल्याने स्थानिकांसह नवी मुंबईकरांकडून समाधान व्यक्त होत आहे.

वाशी हे शहरातील मध्यवर्ती उपनगर असून व्यापारी केंद्र आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाचे असून स्थानिकांसह सर्वानाच अनेक वर्षे भेडसावणारी समस्या आहे ती वाहतूक कोंडीची. बेकायदा फेरीवाले आणि पार्किंग धोरण व वाहनतळ अपुरी पडत असल्याने ही कोंडी होत असते. एक वेळ मुंबईत वाहन पार्किंगसाठी जागा मिळेल मात्र वाशीत नाही.. अशी भावना वाहनचालकांची झाली आहे. वाशी सेक्टर ९, १० तसेच १५ व १६, वाशी-कोपरखैरणे रस्त्यावर फेरीवाल्यांनी ताबा घेतलेला आहे. सुई-दोऱ्यापासून पादत्राणे, उच्च प्रतीचे कपडे अशा सर्व वस्तूंच्या विक्रीचे दालन रस्त्यावर भरत असते. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होत असते. सणांच्या काळात तर वाशीचे ‘दादर’ होते. रस्ते प्रशस्त असले तरी निमुळते होत असून वाहतूक कोंडी होत असते. त्यात वाहनचालकांचा बेशिस्तपणाही कारणीभूत ठरत आहे. याचा फटका स्थानिकांसह नवी मुंबईकरांना बसत असल्याने पार्किंग व फेरीवाला धोरण पालिका कधी राबविणार, आमची वाहतूक कोंडीतून सुटका कधी होणार, असा सूर ऐकायला मिळत आहे.

प्रभागांची रचना

वाशी विभागात प्रभाग ६१ ते ६५ मध्ये सेक्टर भाग आणि गावठाण परिसर येतो. यात प्रभाग ६५ हा गावठाण ते व्यावसायिक केंद्र अशी ओळख निर्माण होत असलेला वाशी रेल्वे स्थानक परिसर येतो. यात सेक्टर ३० व ३२ चा भाग व वाशी गावात येतो. प्रभाग ६१ मध्ये सेक्टर १० आणि ९, तर प्रभाग ६२ मध्ये सेक्टर १५, १६, १६ ए याचा समावेश होतो. प्रभाग ६३ मध्ये वाशी सेक्टर १७, सेक्टर १ चा काही भाग येतो. तसेच प्रभाग ६४ मध्ये सर्वाधिक सेक्टर येत असून सेक्टर १चा अर्धा भाग व सेक्टर ३ ते ८ येतात.

विद्यमान नगरसेवक

*  प्रभाग क्रमांक ६१ : किशोर पाटकर (शिवसेना)

*  प्रभाग क्रमांक ६२ : अंजली वाळुंज (भाजप)

* प्रभाग क्रमांक ६३ : दयावती शेवाळे (भाजप)

* प्रभाग क्रमांक ६४ : दिव्या गायकवाड (भाजप)

* प्रभाग क्रमांक ६५ : फशीबाई भगत (भाजप)

फेरीवाल्यांना हटवा

प्रभाग ६५ मध्ये वाशी गाव, वाशी सेक्टर ३० आणि ३२ चा समावेश होतो. त्यामुळे एकीकडे गावठाण भाग तर दुसरीकडे शहरातील उच्चभू मॉल संस्कृती अशी रचना या प्रभागाची आहे. वाशी गावात बेकायदा फेरीवाले, पार्किंग ही समस्या आहेच, शिवाय महामार्गामुळे वाहनांचे आवाज व धुळीच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत. वाशी सेक्टर ३० व ३१ हा भाग वाशी स्टेशन परिसर असल्याने बेकायदा फेरीवाले ही मोठी समस्या आहे. येथील किऑस्कमध्ये दुकान एकाच्या नावाने असले तरी पोटभाडेकरू किमान १० ते १५ असून ते विविध व्यावसाय थाटून बसलेले असतात. वाशी गाव आणि वाशी सेक्टर ३ हा परिसर जोडणारा एक भुयारी मार्ग केल्याने समाधान असले तरी महामार्गावर याचा रस्ता बंद करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

प्रभागनिहाय समस्या

पुनर्विकास रखडला

प्रभाग ६१ मध्ये सर्वात मोठी समस्या ही सिडकोकालीन धोकादायक घरांची आहे. या इमारती जीर्ण अवस्थेत असून १५ गृहनिर्माण संकुलांतील लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. यातील दोन संकुलांतील रहिवाशांना जुईनगर येथे संक्रमण शिबिरात हलविले आहे. या १५ संकुलांतील सुमारे ५ हजार सदनिकाधारकांचे घराचे स्वप्न सिडकोच्या निकृष्ट बांधकामामुळे भंगले असून मतांच्या बेरजेच्या राजकारणामुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याचा आरोप येथील रहिवासी करीत आहेत.  या ठिकाणी पार्किंगची समस्या आहे, मात्र पुनर्विकास मार्गी लागल्यानंतर ही समस्याही सुटणार आहे. वर्षांनुवर्षे येथील घरे पडीक अवस्थेत असल्याने ती डास उत्पत्तीची केंद्रे बनली आहेत. त्यामुळे डासांचा उपद्रव येथील रहिवाशांना नकोसा झाला आहे.

धारण तलावातील गाळ काढा

प्रभाग ६४ हा नवी मुंबईतील मोठा प्रभाग आहे. सेक्टर १ चा काही भाग आणि सेक्टर ३ ते ८ या प्रभागात येतात. येथील लोकसंख्या अन्य प्रभागांच्या अतुलनेत सर्वाधिक असून तब्बल ३० हजार आहे व मतदारसंख्या १३ हजारांच्या घरात आहे. या प्रभागाची सर्वात मोठी समस्या म्हणजे धारण तलाव आणि पार्किंग ही आहे. प्रभागातील ग्राफिटी वॉल हे आकर्षण ठरत असून सागर विहार येथे सूर्योदय व सूर्यास्त पाहण्यासाठी मनोरा बांधला असून येथे गर्दी होत आहे.

वीजपुरवठा सुरळीत करा

प्रभाग ६२ मध्ये पार्किंग हीच मोठी समस्या आहे. या ठिकाणी सेक्टर १६ आणि १५च्या अंतरभागात रस्ते अत्यंत छोटे असल्याने वाहन उभे केल्यानंतर दुसरे वाहन पास होताना अडचण निर्माण होते. धारण तलावात गाळ साठल्याने त्याची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. या तलावाची साफसफाई करण्याची मागणी होत आहे. सिडकोकालीन वीजवाहिन्या जीर्ण झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. मलनि:सारण वाहिनी बदलल्याने दरुगधी, डासांचा प्रादुर्भाव यातून सुटका झाली आहे. प्रभागातील तिन्ही उद्यानांचे सुशोभीकरण झाले आहे.

गॅरेजवाल्यांना हटवा

प्रभाग ६३ मध्ये वाशी सेक्टर १७ आणि १चा काही भाग येतो. नवी मुंबईतील व्यापारी केंद्र म्हणून या भागाची ओळख आहे. या ठिकाणी अनेक वर्षांपासून पार्किंगची समस्या आहे. सेक्टर १७ येथील जे. के. चेंबर इमारतीतील वाहन सजावटीची दुकाने कारणीभूत ठरत आहेत. याशिवाय अरेंजा कॉर्नरनजीक असलेला नाला या प्रभागातील रहिवाशांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. रात्री अचानक येणारा उग्र वास व डास यामुळे येथील नागरिकांची झोप उडाली आहे. सेक्टर एक परिसरातील गढूळ पाण्याची समस्या दूर झाली आहे. तसेच रस्त्यावर पोलिसांनी जप्त केलेली वाहने हलविण्यात आल्याने पदपथांनी १५ वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला आहे.

पुनर्विकास रखडला

प्रभाग ६१ मध्ये सर्वात मोठी समस्या ही सिडकोकालीन धोकादायक घरांची आहे. या इमारती जीर्ण अवस्थेत असून १५ गृहनिर्माण संकुलांतील लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. यातील दोन संकुलांतील रहिवाशांना जुईनगर येथे संक्रमण शिबिरात हलविले आहे. या १५ संकुलांतील सुमारे ५ हजार सदनिकाधारकांचे घराचे स्वप्न सिडकोच्या निकृष्ट बांधकामामुळे भंगले असून मतांच्या बेरजेच्या राजकारणामुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याचा आरोप येथील रहिवासी करीत आहेत.  या ठिकाणी पार्किंगची समस्या आहे, मात्र पुनर्विकास मार्गी लागल्यानंतर ही समस्याही सुटणार आहे. वर्षांनुवर्षे येथील घरे पडीक अवस्थेत असल्याने ती डास उत्पत्तीची केंद्रे बनली आहेत. त्यामुळे डासांचा उपद्रव येथील रहिवाशांना नकोसा झाला आहे.

धारण तलावातील गाळ काढा

प्रभाग ६४ हा नवी मुंबईतील मोठा प्रभाग आहे. सेक्टर १ चा काही भाग आणि सेक्टर ३ ते ८ या प्रभागात येतात. येथील लोकसंख्या अन्य प्रभागांच्या अतुलनेत सर्वाधिक असून तब्बल ३० हजार आहे व मतदारसंख्या १३ हजारांच्या घरात आहे. या प्रभागाची सर्वात मोठी समस्या म्हणजे धारण तलाव आणि पार्किंग ही आहे. प्रभागातील ग्राफिटी वॉल हे आकर्षण ठरत असून सागर विहार येथे सूर्योदय व सूर्यास्त पाहण्यासाठी मनोरा बांधला असून येथे गर्दी होत आहे.

सागर विहारचा पूल अपूर्णच

सागर विहार परिसरातील प्रभाग ६० आणि ६४ दरम्यानचा नाल्यावरील पादचारी पूलावर वर्षभरापूर्वी दुर्घटना घडली. यानंतरही या पुलाचे काम अद्याप पूर्णत्वास गेले नाही.

वाहनतळांची केवळ चर्चाच

पार्किंगसाठी येथील नाल्यावर व्यवस्था केली आहे. मात्र उपयोग होत नाही. वाशी बस स्थानकाच्या पाठीमागे पार्किंगचीही हीच अवस्था आहे. वाशी सेक्टर २८ आणि सेक्टर १७, नवरत्न हॉटेलसमोरील जागेत बहुमजली वाहनतळ कागदावरच आहे.

वाशी काही वर्षांपूर्वीपर्यंत टुमदार शहर हाते. आता वाशीचे दादर होत आहे. मुंबईत ज्या समस्या आहेत त्या समस्या वाशीत भेडसावत आहेत. पार्किंगला जागा नाही, पदपथावर फेरीवाल्यांचा ताबा असल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा राहत नाही.

-अर्जुन काळे

वाशी सेक्टर १७ येथील वाहनांच्या सजावटीची दुकाने हटवा. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल.

-कांचन आहुजा

वाशीमध्ये एका गोष्टीचे आश्चर्य वाटते, ठरावीक काही दिवसांनी विकासकामांच्या नावाने पदपथ उखडून पुन्हा तेच पेव्हर ब्लॉक लावले जातात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फार त्रास होतो. चांगले पदपथ उखडून पुन्हा पुन्हा कशासाठी दुरुस्ती केली जाते.

-विद्याधर पाठक

Story img Loader