उरणमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित
उरणमधील काही भागातील वीजपुरवठा रविवारी रात्री साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान खंडित झाल्याने संतप्त नागरिकांनी रात्री येऊन महावितरणच्या उरण कार्यालयाची मोडतोड केली. ऐन उन्हाळ्यात आधीच उकाडय़ामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ामुळेही त्रास सहन करावा लागत आहे. ही स्थिती उन्हाळ्यात असल्याने पावसाळ्यात नियमित वीजपुरवठा होईल का, असा प्रश्न आता उरणमधील नागरिकांकडून केला जात आहे.
गेल्या आठवडय़ात बारा तास वीज खंडित झाली होती. त्यानंतर सुट्टीचा दिवस असताना रविवारी रात्रीच्या वेळी वीज खंडित झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला त्यामुळे साडेबारा ते एकच्या दरम्यान उरण कोट नाका येथील महावितरण कार्यालयवार जमा झालेल्या संतप्त नागरिकांनी येथील कार्यालयाच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला. यावेळी नागरिकांना तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली. त्यानंतर महावितरणकडून झालेल्या कारवाईनंतर वीज पूर्ववत झाली. महावितरण कंपनीकडून केल्या जाणाऱ्या उरण शहर व परिसरातील गावातील वीजपुरवठा अनियमित असल्याने महावितरण विरोधात ग्राहकांमध्ये राग आहे. त्यातच दर महिन्याला सध्या वीजच्या बिलात मोठी वाढ होत आहे. नियमति वीज बिले भरूनही वीजपुरवठा खंडित का होतो, असा सवाल उरणमधील ज्येष्ठ नागरिक विश्वास गायकर यांनी केला आहे.
या संदर्भात उरण महावितरणचे साहाय्यक अभियंता पी.एस.साळी यांच्याशी संपर्क साधला असता केगांव परिसरातील वीज रात्रीच्या वेळी जात असल्याचे सांगून ती कशामुळे जाते याचा तपास केला जाणार आहे.त्यासाठी एक टीम तयार करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तर रविवारी रात्री काही मंडळींनी कार्यालयाच्या काचा फोडल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच यावर्षी पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न करीत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.