पनवेल ः सिडकोच्या जलवाहिन्यांवर बसविण्यात आलेले जलमापके चोरी होत असल्याने काही महिन्यांपूर्वी बालकांना कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर जलमापकांची चोरी थांबली होती. मात्र पुन्हा एकदा कळंबोली येथील सिडको मंडळाच्या पाणी विभागाच्या कार्यालयात रहिवाशी जलमापके चोरी होण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे.
कळंबोली येथील बैठ्या चाळींमध्ये (एल. आय. जी.) जलवाहिनीवर सिडको मंडळाने बसविलेली जलमापके दिवसाला ८ पेक्षा अनेक चोरली जात असल्याने रहिवाशी वैतागले आहेत. नेमके कोण चोरी करतो यासाठी काही जागरुक नागरिक व गृहिणींनी पाळत ठेवली तरी जलमापकांची चोरी होत आहे. चोर न सापडल्याने रहिवाशांनी सिडकोच्या कार्यालयातील पाणीपुरवठा विभागात येऊन लेखी तक्रारी दिल्या आहेत.
हेही वाचा – उरण : जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा, भात पिकांवरील रोगाचा प्रतिबंध होण्यास मदत
यापूर्वी जलमापके चोरी जात असल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. पोलिसांनी पाळत ठेऊन काही बालकांना या प्रकरणात ताब्यात घेतले होते. तसेच संबंधित बालकांचा एक गट भंगार व्यावसायिकाला चोरी केलेले जलमापके विक्री करत असल्याची ध्वनीचित्रफीतसुद्धा समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.