लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशी येथील मुंबई कृषि उत्पन्न फळ बाजारात १७ नोव्हेंबरला २०२२ ला मोठी आगीची घटना घडली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर फळ बाजारातील गाळ्यांचे नुकसान झाले होते. या आगीच्या घटनेवरून एपीएमसी प्रशासनाने समिती गठित करून अहवाल तयार करण्याचे नियोजन आखले होते हा अग्नी अहवाल तयार झाला असून संचालक मंडळापुढे तो मंजुरीसाठी ठेवण्यात येणार होता. मात्र सध्या एपीएमसीतील संचालक मंडळाचे तीनतेरा वाजले असून हा अहवाल मंजूर करता येत नसल्याने या अंतर्गत नमूद केलेल्या मुद्द्यांवर कारवाई करण्यास विलंब होत आहे, अशी माहिती एपीएमसी प्रशासनाने दिली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो गाड्या तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. ही एपीएमसी आशिया खंडातील जरी सर्वात मोठी बाजारपेठ असली तरी या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधा मात्र तोकड्या पडत आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा नाही तसेच सक्षम अग्निशमन यंत्रणा देखील नाही. त्यामुळे एपीएमसीत चोरी, आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये एपीएमसीतील फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर आगीचे घटना घडली होती. या आगीमध्ये २५ ते ३० गाळ्यांचे नुकसान झाले होते. यावेळी नवी मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाने ही आग शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कागद पुठ्ठे असल्याने आगीचे लोन लांब पर्यंत पोहचले,त्यामुळे मोठी हानी झाली आहे.

आणखी वाचा- नवी मुंबई : महापालिका सीबीएसई शाळांची लॉटरी येत्या गुरुवारी काढण्यात येणार

एपीएमसी प्रशासनाने यासाठी पाचही बाजाराचे उपसचिव आणि अभियंता यांची एक समिती गठित केली होती. या समितीने पाच ही बाजाराचा पाहणी दौरा करून अहवालात अनेक मुद्दे नमूद केले आहेत. यामध्ये अनधिकृत बांधकाम, वाढीव जागेचा गैरवापर, सीसीटीव्ही यंत्रणा नाही, प्रत्येक गाळ्यामध्ये अग्निशामक यंत्रणा असणे गरजेचे आहे. हे सर्व मुद्दे मांडण्यात आले आहेत. हा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. मात्र हा अहवाल तयार असून केवळ संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी घेऊन पुढील धोरण स्पष्ट होणार होते. मात्र सध्या बाजारात संचालक मंडळळाचे कोरम पूर्ण नसल्याने बैठका होत नाही. त्यामुळे इतर कामे खोळंबली असून हा अहवाल ही मंजुरीच्या कात्रीत अडकला आहे.

एपीएमसीतील आगीच्या घटनेनंतर समिती गठीत करून अहवाल तयार करण्यात आलेला आहे. मात्र मंजुरीसाठी संचालक मंडळाकडे सादर करण्यात येणार आहे. मात्र सध्या संचालक मंडळाच्या बैठका होत नाहीत. -सुरेश मोहाडे, कार्यकरी अभियंता