नवी मुंबईतील एपीएमसी पोलिसांनी गांजा विक्री प्रकरणी दोन आरोपींना अटक केले आहे. यात एका महिलेलाही समावेश आहे. त्यांच्या कडून २६ हजार रुपयांचा तेराशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. नजमुल मेहबुब शेख, आणि धनलक्ष्मी अलगर स्वामी, असे अटक आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा >>> नवी मुंबई : जेवणाचे ताट डोक्यात मारून हत्या, मृत आणि आरोपी दोन्ही मनोरुग्ण
दोघांना वाशीतून अटक केले असून दोघेही मूळ पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. या दोघांच्या बाबत शनिवारी एपीएमसी पोलिसांना माहिती मिळाली होती की वाशी सेक्टर १९ पुनीत टॉवर परिसरात दोन व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारावर एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी तात्काळ एक पथक पाठवले. आरोपी पैकी एक महिला आहे अशीही माहिती मिळाल्याने या पथकात महिला पोलिसांचाही समावेश करण्यात आला होता. सदर पथकाने खबऱ्याने दिलेल्या माहिती नुसार या आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यांच्याशी केलेल्या चौकशीत गांजा विकत असल्याचे समोर आले. याच भागातील झोपडपट्टीतील त्यांच्या झोपडीत जाऊन छापा टाकला असता त्यांच्या कडे २६ हजार रुपयांचा तेराशे ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी दिली.