नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या ३ आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींनी चोरी केलेले १३ लाख ६७ हजार रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
अमोल किसन पाटील, अनिकेत तानाजी पाटील, विनायक सुरेश मोरे असे आरोपींची नावे आहेत. ए.पी.एम.सी भाजी मार्केट येथे फिर्यादी नवीनकुमार श्रवण मिश्रा यांचा कोणतरी अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. एकंदरीत एपीएमसी परिसरात मोबाईल चोरीत होणारी वाढ पाहता ए.पी.एम.सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख व पोलीस निरीक्षक सुधारक ढाणे यांनी पथक निर्माण करून तपास सुरू केला.
हेही वाचा – नवी मुंबई : कांद्याच्या दरात पुन्हा वाढ ; घाऊक बाजारात कांदा २६ रुपयांवर
हेही वाचा – ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेसाठी नवी मुंबई महापालिकेकडून १५ रुपयांत काठीसह तिरंगा मिळणार
या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून व गुप्त बातमीदार मार्फत माहिती प्राप्त केली गेली. त्यात आरोपी निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सदर आरोपींचा शोध घेत सापळा लावून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे नमुद गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास केला असता त्यांनी ए.पी.एम.सी पोलीस ठाणे हद्दीतून तसेच इतर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या १०५ विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त करण्यात एपीएमसी पोलीस ठाणे पथकास यश आले आहे.