नवी मुंबई : एपीएमसी सेक्टर १९ येथील बाजार आवारात दुकानधारकांचा वाढीव जागेचा वापर, अनधिकृतपणे वाहन पार्किंग यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. सणउत्सवात या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी असते, यावर आळा घालण्यासाठी एपीएमसी वाहतूक पोलिसांनी विविध उपाययोजना करून या ठिकाणची वाहतूक कोंडी समस्या सोडवली आहे.
एपीएमसी माथाडी भवन येथील बाजारात आधीच पार्किंगची समस्या उद्भवत आहे. या बाजार परिसरातील रस्ता हा पाचही बाजारांना जोडला गेला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामध्ये रस्त्यावर अनधिकृत पार्किंगचा विळखा असतो. अशातच येथील व्यापारी दुकानधारक आपला बाजार वाढीव जागेत मांडून ठेवत असतात.
हेही वाचा >>> पवार, ठाकरे नेमके कुणाचे? फूट पडूनही शेकापकडून प्रचार पत्रकांमध्ये नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर
या ठिकाणी विद्युत रोषणाईचे सामान, किराणा बाजार, किरकोळ बाजार अशी अनेक प्रकारची दुकाने आहेत. मात्र ही मंडळी त्यांचे सामान अधिक जागेत पसरवून ठेवून मार्जिनल जागेचा वापर करीत आहेत. रस्त्यालगत पार्किंग व पदपथाला लागून व्यापाऱ्यांचे बस्तान यामुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दुकानधारकांची बैठक घेऊन अतिरिक्त जागेचा वापर न करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या होत्या. त्याचबरोबर या ठिकाणी तसेच एपीएमसी परिसरात जवळजवळ २०-२५ वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करून वाहतूक समस्या उद्भवणार याची दक्षता घेण्यात आली.
हेही वाचा >>> रायगड काँग्रेस अखेर प्रचारात सक्रिय; काँग्रेसच्या बैठकीत निर्णय झाल्याची महेंद्र घरत यांची माहिती
एपीएमसी माथाडी भवन येथे नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते, यावर तोडगा काढण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर येथील दुकानधारकांची बैठक घेऊन वाढीव जागेचा वापर न करण्याचे देखील सूचना करण्यात आल्या होत्या. सकाळी ते गर्दीच्या वेळी या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काटेकोरपणे नियोजन आखण्यात आले होते. – विमल बिडबे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग एपीएमसी