मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार आवारात उभ्या असलेल्या ट्रकला आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच वाशी अग्निशमन दलाने घटना स्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र ट्रक मध्ये कोणीही नसल्याने सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही .
हेही वाचा >>>नवी मुंबई : चोरट्याने पावणेचार लाखांची रोकड नेलीच सोबत आरसीबुकही नेले
एपीएमसी ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे याठिकाणी नित्याने हजारोंच्या संख्येने मोठं मोठ्या वाहनांची ये- जा तर असतेच शिवाय ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा बाजारपेठत धान्य बाजारात शनिवारी सकाळी १०.३० वाजता बाजार आवारात झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. यावेळी तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले.ट्रक मधील वायरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वाशी अग्निशमन दलाने वर्तवला आहे. या ट्रक मधून धान्य खाली केल्यानंतर ट्रक उभा होता. त्यामुळे ट्रकमध्ये वाहन चालक , सहाय्यक नव्हते. सुदैवाने कुठलीही जिवित हानी किंवा कोणीही जखमी नाही. मात्र या आगीत ट्रकचा दर्शनी भाग जळून खाक झाला आहे . यामुळे पुन्हा एकदा एपीएमसी अग्नीसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.