उरण : उरण ते खारकोपर मार्गावरील लोकलच्या स्थानकात उभ्या करण्यात येणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी रेल्वेकडून आकारल्या जाणाऱ्या भरमसाट शुल्कामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आले असून निवेदनाद्वारे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या महागृहनिर्माणाला गती

मध्य रेल्वेने वाहनतळाचे दरपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दुचाकीकरिता २ तासांसाठी १० रुपये, २ ते ६ तास १५ रुपये, ६ ते १२ तास २० रुपये, त्यापुढील कालावधीसाठी ३० रुपये आकारण्यात येणार आहेत. हे दर सामान्य प्रवाशांना न परवडणारे आहेत. लोकल प्रवासाचे १५ ते २० रुपये तिकीट दर आहेत. मात्र त्याच वेळी वाहन उभे करण्यासाठीही तेवढेच पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे येथील हजारो प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा >>> वाहतूक कोंडीने उरणवासीय त्रस्त; सुट्टी संपताच विद्यार्थी पुन्हा कोंडीत अडकले

वाहतूक विभागाच्याही कारवाईचा बडगा वाहनतळाचे दर परवडत नसल्याने प्रवाशांनी स्थानकांच्या शेजारी उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून भरमसाट दंड आकारला जात आहे. त्यामुळे समाजमाध्यमातून वाहतूक पोलिसांच्या विरोधातही संताप व्यक्त केला जात आहे. ही कारवाई येथील स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारीवरून केली जात असल्याची माहिती उरण वाहतूक विभागाचे उपपोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली आहे. रेल्वेचे दर हे सर्वत्र सारखे असून त्यानुसारच दर लागू केल्याची माहिती मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी दिली आहे.