पनवेल : पनवेल पालिकेने गणेश उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी तात्पुरता मंडपाचा ऑनलाईन परवाना काढण्यासाठी एक खिडकी पद्धत सुरू केली आहे. मंडळांच्या कार्यकर्ते व पदाधिका-यांना यासाठी पालिका मुख्यालयात येण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने आणि विनाशुल्क हा परवाना काढता येणार आहे. मागील वर्षी १८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या संकेतस्थळावरुन मंडप परवाना काढले होते. सार्वजनिक मंडळांच्या पदाधिका-यांनी मंडप परवानगीसाठी https://smartpmc.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन पालिका उपायुक्त गणेश शेटे यांनी केले आहे.
१९ सप्टेंबरपासुन गणेशोत्सव सुरु होत आहे. उत्सव साजरा करताना रस्त्यामध्ये मंडप असल्यास वाहतूकीस अडथळा होऊ नये यासाठी रितसर आणि नियम अटी पाळूनच परवाने दिले जात असल्याने पालिकेने एका महिन्यापूर्वी पासूनच परवाना देण्याची कार्यवाही सूरु केली. ही परवानगी देताना रस्त्यात खड्डे करणार नाही, पादचा-यांना त्रास होणार नाही याची दक्षता पालिकेकडून घेतली जाणार आहे. मंडप परवाना देताना मंडळाने विना परवाना जाहिरात फलक लावू नये याकडे पालिका लक्ष्य ठेवणार आहे.
परवाना मिळविण्यासाठी ही कागदपत्रे लागतील
धर्मादाय आयुक्तांकडील नोंदणी प्रमाणपत्र स्कॅन करुन अपलोड करावे.
जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र अपलोड करावे
स्थळदर्शक नकाशा अपलोड करावे