लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून पनवेलमधील ५४४ मतदान केंद्रात मतदानाला जोरदार सुरुवात झाली. मात्र अनेक मतदान केंद्रांत मतदार आणि केंद्राबाहेर नेमलेल्या पोलिसांमध्ये मोबाईल मतदान केंद्रात नेण्यावरुन वाद पाहायला मिळाला. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये ५ लाख ९१ हजार ३१८ मतदार आहेत. सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाने पनवेलमधील मतदान प्रक्रियेसाठी ३४०० अधिकारी कर्मचारी आणि बाराशे पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा नेमले होते.

खारघर वसाहतीमधील गोखले हायस्कूलमधील मतदान केंद्रासह पनवेल शहरातील गुजराथी शाळेतील मतदान केंद्र आणि कळंबोली येथील महाराष्ट्र शाळेतील मतदान केंद्रात सकाळी सात वाजल्यापासून ते नागरिक रांगा लावून मतदान करत होते. निवडणूक विभागाने १२५ वाहने मतदान प्रक्रियेसाठी नेमली होती. मतदान केंद्राबाहेर जेष्ठांना आणि दिव्यांगांना मतदान केंद्रातील मतपेटीपर्यंत सहज जाता यावे यासाठी विशेष यंत्रणा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नेमले होते. परंतु शेकडो मतदारांची नावे छायाचित्र नसल्याने मतदार यादीतून वगळल्याने अनेकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने नवीन पनवेल येथील शेकडो मतदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अनेकांची नावे दुबार असल्याच्या अनेक तक्रारी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या. 

आणखी वाचा-निवडणुकीच्या धामधुमीत पाणथळींवर अतिक्रमण

मोबाईल मतदान केंद्रात आणू नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानापूर्वी प्रसारमाध्यमांतून केले होते. मात्र नागरिकांपर्यंत ही जनजागृती न झाल्याने अनेक मतदार मोबाईल घेऊन मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत गेले. परंतु प्रवेशव्दारावरील सुरक्षा यंत्रणांनी मतदारांना मोबाईल ठेऊन या असे बजावल्यानंतर पोलीस व मतदार यांच्यात वाद झाल्याचे चित्र सर्वच मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर दिसत होते. अनेक ठिकाणी मतदान केंद्रात चालत आलेल्या मतदारांना पुन्हा फोन घरी ठेवण्यासाठी जावे लागल्याने अनेक मतदार घरी परतत असताना दिसत होते. काही मतदान केंद्रात पोलीसांकडे मतदारांचे मोबाईल बाळगण्यासाठी ठेवण्यात आले होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी असे करु नका असे सांगितल्याचे पाहायला मिळाले. अखेर सकाळी आठ वाजल्यानंतर मतदानाचा ओघ कमी झाल्याने काही मतदान केंद्रात मोबाईल बंद करुन जाण्याची मुभा देण्यात मतदारांना देण्यात  आली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arguments between police and voters at many places due to the ban on entry into polling stations with mobile phones mrj