पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले भाजपचे विद्यामान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या या काळातील कामगिरीवरून प्रचारात दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मागील १५ वर्षांत पनवेलचा विकास का झालेला नाही, असा सवाल करत विरोधकांनी यावेळी ठाकूरांना घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाने तरी पनवेलसाठी काय केले असा मुद्दा उपस्थित करत बाळाराम पाटील यांच्यावर टीका केली जात आहे.
नवी मुंबईस लागूनच असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. खारघरसारखे सिडकोने वसविलेले उपनगर या मतदारसंघात येते. मात्र पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट, वाहन कोंडी, वाहनतळाचे प्रश्न या उपनगरालाही भेडसावू लागले आहेत.
आणखी वाचा- सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
पनवेल महापालिकेची कामगिरी या संपूर्ण पट्ट्यात बेताचीच राहिली असून गणेश देशमुखांसाठी एखादा अपवाद वगळला तर पनवेल महापालिकेतील प्रशासन प्रमुखांनाही फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. यंदाच्या निवडणुकीत नेमका हाच मुद्दा गाजू लागला असून विद्यामान आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदान करताना त्यांच्या कामगिरीचा आढावा देखील घ्या असा मुद्दा शेकाप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उपस्थित केला जात आहे. या आरोपांना ठाकूर यांनाही उत्तर द्यावे लागत असून नेवाळी गावातील एका सभेत त्यांनी पनवेलकरांच्या पाणीपुरवठ्याचा पुढील २० वर्षांचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठी योजना राबवली जात असल्याचे त्यांनी जाहीर केले. नैना हा प्रकल्प पनवेलच्या शेतकऱ्यांना नको असेल तर भाजपचीसुद्धा तीच भूमिका असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा-उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
ग्रामीण भागातील पाणीटंचाई, नैना प्रश्न…
शेकापचे बाळाराम पाटील आणि ठाकरे शिवसेनेच्या लीना गरड या दोन्ही उमेदवारांनी आमदार ठाकूर यांना कोंडीत पकडण्यासाठी समस्यांचा मुद्दा हाती घेतला आहे. पंधरा वर्ष सत्तेत असूनही ठाकूर यांनी काय दिवे लावले, असा सवाल पाटील आणि ठाकरे गट उपस्थित करत आहेत. मालमत्ता कराचा बोजा सामान्यांच्या खिशावर लादला. नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्रामुळे (नैना) येथील ४० गावांमधील शेतकरी उद्ध्वस्त होईल, असाही ठाकूर यांच्याविरोधात प्रचार केला जात आहे. ग्रामीण भागात अजूनही पाणीटंचाईचा मुद्दा आहे. हे मुद्दे यावेळी प्रचारात ठाकूर यांच्याविरोधात वापरले जात आहेत.