लोकसत्ता प्रतिनिधी
पनवेल : प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी भव्य मंडपामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला सूमारे सव्वा लाख महिलांना संबोधित करणार आहेत. याच कार्यक्रमात विविध सरकारी प्रकल्पांचा उदघाटन सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने नवी मुंबई पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात येणार आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या मुख्य उपस्थित होणारा सोहळा यशस्वी व सुरक्षितपणे पार पडण्यासाठी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी ४ हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्याचे नियोजन आखले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला पोलीसांचा समावेश असणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये होणाऱ्या सोहळ्यात सूरक्षेत कोणतीही ढिलाई राहू नये यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. तीन दिवसांनंतर (१२ जानेवारी) उलवे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या मैदानावरील भव्य मंडपामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वीपासून बंदोबस्त लावला जाण्याची शक्यता आहे. नवी मुंबई व पनवेलमधील मागील दोन दिवसांपासून वेळेची मर्यादा तोडून चालणाऱ्या लेडीज सर्व्हीस बारवर पोलीसांचे धाड सत्र सुरु झाले आहे.
आणख वाचा-नवी मुंबई : सत्संगनिमित्त कर्नाळा येथे उद्या-परवा वाहतूक मार्गात बदल
नवी मुंबईत मागील काही दिवसात अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड पोलीसांनी केली आहे. साडेसहा लाख चौरसफुटाचे भव्य मंडप आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी उभारण्यात आले असून या मंडपात प्रवेशासाठी चार स्वतंत्र प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारावर पोलीसांचा कडेकोट पहारा असणार आहे. सामान्य नागरिकांसाठी आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या मंडपापर्यंत येण्यासाठी वेगळे द्वार आहेत. १२०० बसगाड्या उभ्या राहील एवढ्या क्षमतेचे वाहनतळावर पोलीसांची करडी नजर असणार आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मेटल डिटेक्टर यंत्राच्या तपासणीतून मंडपामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.