पक्षिप्रेमींसाठी पर्वणी; मिठागर परिसरात आवडते खाद्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : दरवर्षी हिवाळ्यात उत्तरेकडून स्थलांतर करून मुंबई तसेच महामुंबईच्या खाडीपट्टय़ात मुक्कामाला येणारे पाहुणे पक्षी उरणच्या पाणजे, डोंगरी तसेच जेएनपीटी बंदराच्या किनाऱ्यावर दाखल झाले आहेत.

नोव्हेंबर महिना सुरू होताच खाडीकिनारी फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांसह रशिया, आफ्रिका येथून अनेक प्रजातींचे पक्षी स्थलांतर करतात. या पक्ष्यांना पाहण्यासाठी हौशी छायाचित्रकार, पर्यटक, अभ्यासक मोठय़ा संख्येने गर्दी करतात. त्यामुळे नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत खाडीकिनारा अक्षरश: जिवंत होऊन जातो.

किनाऱ्यावरील किडे व मासळी हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असल्याने खाडीकिनारी पक्षी येत आहेत. येथील विकासकामे व पानथळ्यांवरील मातीच्या भरावामुळे पक्ष्यांमध्ये घट होत असली तरी पुन्हा एकदा पक्ष्यांचे दर्शन होऊ लागल्याने पक्षिप्रेमींना पक्षी न्याहाळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

मुंबईच्या शिवडी, नवी मुंबई तसेच उरणमधील खाडी किनाऱ्यावर येणाऱ्या विविध जातींच्या पक्ष्यांची संख्याही अधिक आहे. येथील खाडी किनाऱ्यावर असलेल्या मिठागर परिसरात मिळणारे खाद्य हे यातील फ्लेमिंगो जातीच्या पक्ष्याचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे पाणजेखाडी परिसरात नजर पोहोचेल तिथपर्यंत पक्षीच पक्षी दिसत होते. या पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी मुंंबई,पुणे, ठाणे तसेच देशातील इतर भागांतूनही मोठय़ा संख्येने निसर्ग व पक्षिप्रेमी येत आहेत. सुट्टीच्या दिवशी तर काही शाळांच्या सहली आणल्या जात आहेत ज्यामधून विद्यार्थ्यांना या पाहुण्या पक्ष्यांची माहिती दिली जाते.

या पक्ष्यांचे पानथळ असलेल्या किनाऱ्यांवर मातीचा भराव सुरू आहेत. या कामामुळे होणारा शांततेचा भंग तसेच खाद्य कमी होत असल्याने पक्ष्यांच्या संख्येतही घट होऊ लागली आहे.

– कामिनी ठाकूर, पक्षिमित्र, उरण

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrival of flamingo birds in uran
Show comments