नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी बाजारात हापूसची आवक वाढली असून बाजारभाव उतरले आहेत. वातावरणात उष्मा वाढल्याने आंब्याची तोडणी लवकर केल्याने मंगळवारी बाजारात हापूसच्या सहा हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. परंतु हापूसची लवकर तोडणी केल्याने बहुतांशी आंबे लहान आकाराचे आहेत.हापूसच्या दरात प्रतिपेटी पाचशे ते हजार रुपयांनी घसरण झाली आहे.
आधी ४ ते ६ डझनांच्या पेटीला साडेतीन ते ७ हजार रुपये दराने विक्री होती, ती आता ३ हजार ६ हजार रुपयांनी होत आहे. यंदा चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंतु दरम्यानच्या कालावधीत हवामान बदलाने उत्पादनाला फटका बसत आहे. काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्मा वाढत आहे. हापूसला जादा उन्हाचा तडाखा बसत असून कोकणातील बागायतदार आता आंबा तोडणीवर भर देत आहेत. हापूसला कडक ऊन लागत असून त्याचा दर्जावर परिणाम होत आहे. तसेच आंबे गळून पडत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक तोडणी करण्यावर भर देत आहेत.
मार्चपासून कोकणातील हापूस तसेच कर्नाटक, रायगड आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र कडक उन्हाचा फटका हापूसला बसत असून हापूस बागयतदार यांनी परिपक्व होण्याआधीच तोडणीला सुरुवात केली आहे. बाजारात ८० टक्के लहान तर २० टक्के मोठ्या आकाराचा आंबा दाखल होत आहे.संजय पिंपळे, व्यापारी