नवी मुंबई : यंदा हापूसचे उत्पादन चांगले असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाने उत्पादन कमी झाले आहे. हंगामालाही सुरुवात होण्यास विलंब झाला तर आता मुख्य हंगाम बहर असून ही आवक कमी होऊ लागली आहे. पुढील कालावधीत आणखीन आवक कमी होणार असून १५-२० मेपर्यंत हंगाम राहील असे मत व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता ४-६ डझन पेटीला एक हजार ते अडीच हजार दर आहे.
एपीएमसी बाजारात जानेवारी फेब्रुवारी महिना सुरू होताच अवीट गोडीकरता प्रसिद्ध असलेला कोकणातील हापूस दाखल होण्यास सुरुवात होत असते. या वर्षी हापूस हंगामाला उशिराने सुरुवात झाली आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये हापूसची तुरळक आवक होती तर मार्च अखेरपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली. यंदा मोठ्या प्रमाणात हापूस दाखल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र हवामान बदलाच्या वातावरणाने उत्पादनात घट झाली त्यामुळे यंदा आवक घटली आहे.
एप्रिलमध्ये हापूसच्या मुख्य हंगामाला सुरुवात होत असते. एप्रिल-मे दरम्यान बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस दाखल होतो. परंतु यंदा ४० टक्के उत्पादन असून हंगाम केवळ ४० दिवसांचा आहे. त्यामुळे बाजारात आता आवक रोडावण्यास सुरुवात झाली आहे. एपीएमसी बाजारात गुरुवारी कोकणातील हापूसच्या ६२ हजार २३५ पेट्या तर कर्नाटक येथील ३४ हजार ३६० पेट्या दाखल झाल्या आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत हापूसची आवक कमी झाली आहे.