शिरवणेतील संकुलात हजेरी शेड, कचराकुंडय़ा; मैदानातील खेळण्यांची मोडतोड
सांस्कृतिक कार्यक्रम आणि समारंभांसाठी उभारण्यात आलेल्या शिरवणे सेक्टर १ मधील महाराष्ट्रभूषण श्री. नानासाहेब धर्माधिकारी कलासंकुलाला सध्या सफाई कामगार शेडची अवकळा आली आहे. या संकुलात आता कचराकुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. सफाई कामगारांचे कपडे सर्वत्र पसरलेले असतात.
१९ फेब्रुवारी २०१०ला तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक, तत्कालीन महापौर अंजनी भोईर यांच्या उपस्थितीत या कला संकुलाचे उद्घाटन झाले. सध्या या इमारतीतील काही भाग वाशी येथील वाचनालयासाठी देण्यात आला आहे. हे वाचनालय वाशीमध्येच सुरू असून या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वाचनालयाची ठेवण्यात आली आहेत. याच संकुलाच्या तळमजल्यावर पालिकेचे सफाई कामगार हजेरी लावण्यासाठी येतात. त्यासाठी बायोमेट्रिक यंत्र लावण्यात आले आहे. कामगारही याच इमारतीच्या तळमजल्यावर असतात. तिथेच रिकाम्या कचराकुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. ठेकेदाराचे सामानही तिथेच ठेवण्यात आले आहे. संकुलाभोवत अस्वच्छता आहे. बाजूलाच गावदेवी मैदानात लहान मुलांना खेळण्यासाठी हत्तीच्या आकाराच्या घसगुंडय़ा आणि अन्य खेळणी लावलेली आहेत. मात्र दोन्ही बाजूंचे हत्ती तुटले आहेत. त्यांचा अर्धाच भाग शिल्लक आहे. रात्री येथे गैरप्रकार सुरू असतात. तिथेच पत्ते पडलेले असतात. संकुलातील सर्वात वरील जिन्यावर सफाई कर्माचाऱ्यांचे गणवेश इतस्तत: पसरले असतात. खुल्या सभामंडपाचा चुकीचा वापर होत आहे. महापौर जयवंत सुतार यांच्या प्रभागातच हे कलासंकुल असूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.या इमारतीमध्ये अस्वच्छता असून तळमजल्यावरील स्वच्छतागृहही बंद आहे. याबाबत महापौर जयवंत सुतार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही.
इमारतीचा काही भाग वाचनालयासाठी दिला आहे. तिथे पुस्तके ठेवण्यात आली आहेत. उर्वरित भाग सफाई कामगारांसाठी हजेरीशेड म्हणून दिला असल्यास त्याबाबत चौकशी करण्यात येईल. वास्तूची पाहणी करून तात्काळ सफाई केली जाईल. कोणी गैरवापर करत असल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
– दादासाहेब चाबूकस्वार, उपायुक्त मालमत्ता विभाग