खारघर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शीव-पनवेल महामार्गाच्या डाव्या बाजूला वसलेले खारघर हे गाव आज चारही बाजूंनी सिडकोच्या वसाहतींनी वेढलेले आहे. शहरीकरणाच्या रेटय़ात इथले गावपण हरवून गेले आहे, मात्र कधीकाळी हे गाव सर्व दृष्टींनी सुजलाम् सुफलाम् होते. गावात भातशेती होत असे. दुधी भोपळा व टॉमेटोच्या उत्पादनासाठी हे गाव प्रसिद्ध होते. परिसरातील इतर गावांपेक्षा इथले रहिवासी अधिक संपन्न आणि शांत होते. गावकऱ्यांमध्ये वादविवाद नव्हते. गावात आजवर कोणत्याही कारणास्ताव एकही खून झालेला नाही, दरोडा पडलेला नाही, हे येथील ग्रामस्थ अभिमानाने सांगतात.
रायगड जिल्ह्य़ाच्या उत्तर बाजूस असलेले खारघर गाव एक मोठी गुप्र ग्रामपंचायत म्हणून ओळखले जात असे. कोपर, बेलपाडा, फणसवाडी आणि हेदरवाडी अशा चार पाडय़ांची ही ग्रुप ग्रामपंचायत शेतकऱ्यांची कर्मभूमी होती. चारही बाजूंनी विस्र्तीण शेतजमीन असलेल्या खारघरमधील प्रकल्पग्रस्तांची कमीत कमी ६०० एकर जमीन नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. त्यामुळे सिडको आज या गावाच्या चारही बाजूंनी खारघर नावाची अद्ययावत व आधुनिक वसाहत उभारू शकली आहे.
स्वखुशीने सिडकोला दिलेल्या जमिनीमुळे तेच सौख्य आजही खारघर शहरी भागात दिसून येत आहे. सिडकोचा आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स आणि सेंट्रल पार्क या दोन वास्तू खारघरमधील ग्रामस्थांच्याच जमिनींवर उभ्या आहेत. विशेष म्हणजे नवी मुंबईतील पहिली मेट्रोही खारघरमधील ग्रामस्थांच्या भूमीवरच चालणार आहे. ६०-७० वर्षांपूर्वी गावाची लोकसंख्या दोनशे ते चारशे एवढीच होती. ती आता दहापट झाली आहे. पूर्वी गावात ९९ टक्के लोकवस्ती ही आगरी समाजाची होती. केवळ बाबूराव बुवांचे एक घर हे ब्राह्मणांचे होते. गावात हनुमान, गावदेवी, ही दोन मंदिरे आहेत. याशिवाय गावच्या बाहेर असलेली पण आता सिडको नागरी वसाहतीचा एक भाग झालेली वाघेश्वर, साबाई, गणोबा, चेरोबा ही देवस्थाने पुरातन मानली जातात. साबाई जागृत देवस्थान मानले जाते. या मंदिराच्या आसपास विकासाची कामे करताना पोकलेन सातत्याने बंद पडत होते. त्या वेळी देवीला नवस केल्यानंतर कामे मार्गी लागली, अशी आख्यायिका ग्रामस्थ सांगतता. चैत्र महिन्याच्या सुरुवातील गावातील गावदेवीची जत्रा होते. या निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक नातेवाईक या गावात येतात. गावातील हनुमान मंदिराच्या आवारात पूर्वी चौथीपर्यंतची शाळा भरत असे. पुढील शिक्षणाची सोय गावात नसल्यामुळे अनेकांना उच्चशिक्षण घेता आले नाही. काळुराम पाटील यांनी मात्र गावची वेस ओलांडून तळोजा गाठले आणि माध्यमिक शिक्षण घेतले. गावात शिक्षणाची वाट १९७० नंतर सुकर झाली.
सुदाम भोकाजी पाटील हे या ग्रुप ग्रामपंचायतीचे पहिले संरपंच ओळखले जातात. त्यांचे चिरंजीव गजानन पाटील हे गेली १७ वर्षे देवाळेश्वर मंदिराचे विश्वस्त आहेत. हेच मंदिर ग्रामस्थांनी पहिल्यांदा घरटी तांदूळ जमा करून श्रमदानातून बांधले. हाच क्षण गावाच्या दृष्टीने आनंदाचा मानला जातो. याच मंदिराचा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. आत्ताच्या पिढीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. चांगेल वातावरण आणि सकस आहार यामुळे या गावातील ग्रामस्थांना चांगले आयुष्यमान लाभत असे. १०१ वर्षांचे गोिवद पदु खडकर हे गावाच्या विकासाचे साक्षीदार आहेत.
सिडको आणि एमआयडीसीच्या आगमानानंतर या गावाचा काही प्रमाणात विकास झाला. शेती गेल्यामुळे अनेक ग्रामस्थांनी नोकऱ्या पत्करल्या. शीव-पनवेल महामार्गामुळे या गावाचा पनवेलशी संपर्क वाढला. दोन गावांच्या मध्ये विस्र्तीण खाडी असल्याने या गावातील ग्रामस्थ पनवेलला जाणे टाळत होते. १९६५ मध्ये एमआयडीसीने तळोजा एमआयडीसी विकसित करण्यास सुरुवात केल्यानंतर शीव-पनवेल महामार्गाअगोदर येथील ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी एक लोखंडी पूल बांधला. या पुलाने ग्रामस्थांना पनवेल तालुक्याशी जवळ आणले.
याच गावाच्या ग्रुप ग्रामपंचायतीचा भाग असलेल्या कोपरा गावाला लागूनच खाडी आहे. येथील रहिवाशांच्या आहारात मासे हा अविभाज्य घटक होता आणि आजही आहे. गावात सत्तरच्या दशकात पाणी आणि वीज आल्याची नोंद आहे. त्यापूर्वी कुंभार विहीर हीच सर्व गावाची तहान भागवत होती. गावात कधी टोकाची हिंसा झाली नाही. आपआपसात मतभेद भांडणे झालीच तर ती सामोपचाराने सोडविली जात होती. त्यामुळे गावातील वातावरण आजही समाधानी आहे. गावाच्या चारही बाजूंनी आज उंचउंच इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे गाव कुठे आहे हे शोधावे लागते. सेंट्रल पार्कच्या समोर असलेल्या या गावात प्रवेश करताना स्वागताची एक कमान आहे. इतर गावांप्रमाणे अनधिकृत बांधकामाची ‘लागण’ या गावातही झाली आहे, पण त्याचे प्रमाणे कमी आहे. सिडकोच्या १४ नोडपैकी हा नोड विस्तीर्ण आणि अद्ययावत आहे. खारघर रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर आणि शीव पनवेल महामार्गापासून हाकेच्या अंतराव असलेले हे गाव मात्र शहरीकरणामुळे हरवून गेले आहे.
भात, भोपळा, टोमॅटो
खारघर गावात मोठय़ा प्रमाणात भाताचे उत्पादन घेतले जात असे. नंतर दुधी, भोपळा आणि टॉमेटोचे उत्पादन घेण्यात येत असे. हे उत्पादनदेखील चांगल्या प्रमाणात हाती येत असे. ही भाजी जमा करून शेतकरी तळोजा येथील महावीर शेठच्या टेम्पोमधून जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून मुंबईला नेत. तिथे तिला चांगला भाव मिळत असे. त्यामुळे ग्रामस्थांच्या हातात दोन पैसे रोख रक्कम पडत असे.
नाटकांचे वेड
दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर रहिवासी संध्याकाळी मंदिरात भजन करत आणि रात्री सातच्या सुमारास गाव झोपी जात असे. गावातील तीन आळींचे तीन वेगवेगळे बुवा ही भजने सादर करीत असत. काही मंडळी नाटक वेडी असल्याने सणासुदीच्या काळात विशेषत: जत्रेसाठी नाटके बसविली जात. त्यात सौभद्रहरण, रामायण, या सारख्या नाटकात गजानन पाटील यांनी काम केले आहे.