नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना श्रावण सण आणि गणेशोत्सवापूर्वीच शहरातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आजही शहरातील गावठाण भागात अंतर्गत रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. याच खड्ड्यातून गणपती विसर्जन मिरवणूक काढण्याची नामुष्की ओढवल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गणपती विसर्जनात खड्ड्यांचे विघ्न असल्याने याच खड्ड्यातून गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली, त्याचबरोबर पावसामुळे या खड्ड्यांचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापालिका दि.८ ऑगस्ट रोजी श्रावणी सण तसेच गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेत शहरातील रस्ते दुरूस्ती कामांना गती द्यावी असे निर्देश दिले होते. त्यानुसार दिघा ते बेलापूर या सर्वच विभागांतील रस्ते दुरुस्तीची कामे जलद गतीने हाती घेण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र गणेशोत्सव विसर्जनात हा दावा फोल ठरला असून बोनकोडे गावात खड्यांतुन गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्याची नामुष्की नागरिकांवर ओढावली होती. त्यात मुसळधार पावसाने खड्डेमय रस्त्यांची अवस्था आणखीन बिकट झाली होती.

हेही वाचा… ज्येष्ठ नागरीक पण लय भारी… विविध कला – क्रीडा गुणदर्शनपर स्पर्धांना ज्येष्ठ नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

रस्त्यावर फुलांचा खच आणि पाणी साचलेल्या खड्यातून विसर्जन मिरवणूक काढताना नागरिकांची त्रेधातिरपट उडाली होती. घणसोली गावात ही तीच परिस्थिती पहावयास मिळाली. गणपती विसर्जनात ही खड्ड्यांचे विघ्न पाहून नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती केली, मात्र शहरातील अंतर्गत रस्ते आणि गावठाणमधील रस्त्यांकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केले आहे. विभागनिहाय ८ तसेच एमआयडीसी क्षेत्राकरिता २ असे १० कंत्राटदार रस्ते दुरुस्तीची कामाकरिता नेमून देण्यात आले आहेत. त्याच बरोबर ४८ तासाच्या आत रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. शहरातील या विभागातील खड्यांबाबत महापालिका आयुक्त सबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As there were potholes in the internal road in navi mumbai ganpati visarjan procession was taken out from the pothole dvr