नवी मुंबई : नवी मुंबईतून काल रात्री मोठ्या प्रमाणात मतदार गावी गेले आहेत. कोपरखैरणे घणसोली भागात मोठया प्रमाणात बस उभ्या असल्याचे दिसून आले. रात्री बारा पासून पहाटे दोन अडीच पर्यंत बस येत होत्या आणि प्रवाशांना अर्थात मतदारांना घेऊन जात होत्या. या बाबत अनेक प्रवाशांना विचारणा केली असता सर्वांनीच मतदानासाठी गावी जात असल्याचे सांगितले. यात सातारा, पाटण, आंबेगाव,कराड जुन्नर परिसरात जाणाऱ्या गाड्यांचा भरणा होता.
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील लोक पोटापाण्यासाठी येत इथेच स्थायिक झालेले आहेत. दोन अडीच दशकाहून जास्त नवी मुंबईत वास्तव्य असूनही मतदानासाठी मात्र आपापल्या गावी जाणे पसंत करतात. या मतदारांनी इथेच थांबून आपल्याला मतदान करावी यासाठी नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोलीतील सर्व पक्षीय आणि अपक्ष उमेदवारांची दमछाक होते. तर असेही काही उमेदवार आहेत की आपल्याला हे मतदार मत देणार नसेल तर विरोधकाला मत देण्यापेक्षा गावीच त्यांनी मतदान केलेले बरे! म्हणून त्यांनाही गावी जाणाऱ्या मतदारांच्या मुळे दिलासा मिळतो.
हेही वाचा >>>यंदा मतदान केंद्रावर मोबाईल वरून वादावादी बंद…
दुसरी कडे आशा हजारोंच्या संख्येने मतदार गावी गेल्याने नवी मुंबईत मतदार करणार्याच्या टक्केवारीत कमालीची घट होते. दुर्दैवाने आजही लाखो मतदार असे आहेत की त्यांची नावे गावी आणि नवी मुंबई असे दोन्ही ठिकाणी आहेत.आदल्या दिवशी रात्री गावी जाऊन तेथे सकाळी सकाळी मतदान करून टाकोटाक नवी मुंबई गाठून येथेही मतदान केले जाऊ शकते.अशी भीती अनेकदा उमेदवारांनी व्यक्त केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे बेलापूर अध्यक्ष किशोर पाटकर यांनीही असे दुबार असणाऱ्या ७३ हजार पेक्षा जास्त मतदारांची नावे शोधून काढली होती. त्यांनी दोन्ही कडे मतदान करू नये म्हणून त्यांचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन तपासून कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
चौकट : मंगळवारी रात्री नेहमी पेक्षा पश्चिम महाराष्ट्रात जाणारे जास्त प्रवासी दिसून येत होते. घणसोली कोपरखैरणे आणि नेरुळ परिसरात अनेक बस प्रवाशांना घेऊन जात होत्या. या शिवाय शीव पनवेल मार्गावर वाशी, सानपाडा नेरुळ सीबीडी आणि कळंबोली सर्कल येथे प्रवाशांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत होती.