नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या शिवडी-न्हावा शेवा ‘अटल सेतू ‘ वर शनिवारी रात्री वीकेंड साजरा करण्यासाठी हौशी पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या सेतूवरून प्रवास करण्यासाठी टोलची मोठी रक्कम वसूल करण्यात येणार असल्याने या ठिकाणी प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो याविषयी पहिल्याच दिवशी उत्सुकता होती.
मात्र सायंकाळी या मार्गावर रपेटीसाठी आलेल्या प्रवाशांना टोलमुक्तीचा सुखद धक्का मिळाला. या मार्गावरील टोल नाक्यांवर मध्यरात्री उशिरापर्यंत टोल वसुली केली जात नव्हती. त्यामुळे अनेक वाहन चालकांनी रात्री उशिरापर्यंत या मार्गावर एकापेक्षा अधिक फेऱ्या मारत शनिवारची रात्र या सागरी सेतूवरच साजरी केली. अटल सेतूवर प्रवास करण्यासाठी एमएमआरडीए कडून यापूर्वीच अडीचशे रुपयांचे एका बाजूचे टोल दर पत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिवसभरासाठी ६२५ रुपये तर दोन्ही बाजूंनी प्रवास करण्यासाठी ३५० रुपयांहून अधिक रकमेच टोल प्रवाशांना भरावा लागणार आहे. यामुळे शनिवारी पहिल्या दिवशी या मार्गावर वाहनचालकांचा कसा प्रतिसाद मिळतो याविषयी उत्सुकता होती. असे असले तरी सकाळपासूनच या सागरी सेतूच्या उत्सुकतेपोटी मुंबई नवी मुंबई ठाणे पनवेल या भागातील हौशी पर्यटकांच्या रांगा अटल सेतूवर लागल्या होत्या. दोन्ही बाजूला विस्तीर्ण मार्गिका असलेला हा सेतू वाहन प्रवासांसाठी कोंडी मुक्त प्रवासाची पर्वनी ठरणार आहे.
पहिल्या दिवशी या सेतूवर मोठ्या संख्येने वाहने येऊन देखील येथील विस्तीर्ण मार्गीकांमुळे अजिबात कोंडी झालेली नव्हती. चिरले पासून सेतूवर सुरुवातीला टोल नाक्यापर्यंत विस्तीर्ण अशी मार्गिका आहे. तसेच टोलनाक्याच्या अलीकडे वाहनांना थांबण्यासाठी मोकळी जागा देखील आहे. या ठिकाणी थांबून सेल्फी तसेच छायाचित्र काढणार यांची मोठी गर्दी सकाळपासूनच दिसून आली. शनिवारची सायंकाळ या सागरी सेतूवर रपेट घडावी यासाठी मोठ्या संख्येने हौशी पर्यटक येथे आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी टोल वसुली केली जात नव्हती. सायंकाळी सात नंतर मध्यरात्री उलटून गेल्यानंतर ही या ठिकाणी टोल वसुली केली जात नसल्याचा सुखद अनुभव शेकडो प्रवाशांना मिळाला. टोल भरून एका बाजूने तरी या मार्गावर रपेट करावी या विचाराने सायंकाळी नंतर या ठिकाणी आलेल्या प्रवाशांचा आनंद टोल वसूल केला जात नसल्याचे पाहून गगनात मावेना असा झाला. त्यामुळे अनेक वाहन चालकांनी या मार्गावर एकापेक्षा अधिक फेऱ्या मारल्या.
शनिवारची रात्र बाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या लक्षनीय असते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल तसेच आसपासच्या भागांमधून मुंबईच्या मरीन ड्राइववर वीक एन्ड साजरा करावयास येणाऱ्यांची संख्या ही भली मोठी असते. अनेकांनी दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी या सागरी सेतूचा पर्याय निवडल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी सात नंतर या सागरी सेतूवर एम एच ४३, एम एच ०४, एम एच ४६ अशा क्रमांकाच्या गाड्यांची संख्या या अटल सेतू वर मोठ्या प्रमाणावर दिसून आली. या अटल सेतू वर मधल्या टप्प्यात कुणीही थांबू नये असे आवाहन एमएमआरडीए मार्फत यापूर्वी करण्यात आले आहे. असे असले तरी या सेतूवर वेगवेगळ्या टप्प्यात असलेल्या रेस्कु एरिया मध्ये विस्तीर्ण अशी मोकळी जागा असल्याने या ठिकाणी गाड्या थांबून रात्रीच्या अंधारात समुद्र न्याहाळण्याकडेही अनेकांचा कल दिसून आला. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांची फारशी गस्त या ठिकाणी नव्हती. त्यामुळे हौशी पर्यटकांचा वीकएंड मोठ्या उत्साहात आणि कोणत्याही अडथळ्याविना या सागरी सेतूवर साजरा झाला.