नवी मुंबई: रात्रीच्या वेळेस एकट्या दुकट्या व्यक्तीस पाहून त्याला लुटण्याची घटना कोपरखैरणे येथे घडली आहे. या वेळेस मोबाईल देण्यास नकार देत प्रतिकार करणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण करून पाच ते सहा जणांचे टोळके फरार झाले आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अमरनाथ वर्मा असे यातील जखमीचे नाव आहे. १४ ऑगस्ट रोजी आपले काम संपवून घरी जात असताना कोपरखैरणे नाका येथे वर्मा आले होते. रात्री अकराच्या सुमारास ५-६ जण त्यांच्या जवळ आले आणि जबरदस्तीने मोबाईल व खिशातील रोख रक्कम काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना वर्मा यांनी प्रतिकार केला असता सर्वांनी मिळून वर्मा यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांच्या छातीला आणि पोटात जबर दुखापत झाली. त्यांना शीव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाची कागदपत्र प्राप्त झाल्यावर १८ तारखेला वर्मा यांचे भाऊ राजेंद्र वर्मा यांनी दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात ५-६ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.