नवी मुंबई : कंपनीने ब्लॅक लिस्टेड केल्याचा राग आल्याने व्यवस्थापकाला मित्राच्या साहाय्याने बेदम मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर यादव, प्रदीप यादव, रोहीत यादव, भोलु यादव (सर्व रा. ठि. विशाल हॉटेलच्या समोर, गांधीनगर, तुर्भे, नवी मुंबई) असे यातील आरोपींची नावे आहेत.
गुरुवारी दुपारी साडेचार पाचच्या सुमारास आरोपींनी एचपीसीएल कंपनी, तुर्भे, नवी मुंबई येथे व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या उदयराज सिंग यांना मारहाण केली. हे कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी पथकासह या ठिकाणी धाव घेतली. सर्व आरोपींना ताब्यात घेतले गेले. याबाबत अधिक माहिती देताना दौंडकर यांनी सांगितले की, स्वस्तिक लॉजिस्टक ट्रान्सपोर्ट कंपनीची सेवा चांगली नसल्याने त्यांना एचपीसीएल कंपनीने ब्लॅक लिस्टमध्ये टाकले होते. त्यामुळे स्वास्तिक लॉजिस्टक ट्रान्सपोर्टमधील टॅकरचालक सागर यादव याने त्याला एचपीसीएल कंपनीने ब्लॅक लिस्ट केल्याच्या रागातून आरोपी सागर यादव व त्याचे मित्र भोलू यादव, रोहीत यादव व प्रदीप यादव यांनी लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर व पायावर मारून गंभीर दुखापत केली, तसेच त्यांच्या डाव्या हाताच्या दंडाला चाकूने मारून त्यांना जखमी करून जिवे मारण्याचा उद्देशाने मारहाण केली.
हेही वाचा – Video: ८४ देशांच्या नाणी आणि नोटा बेस्ट बसमध्ये सापडतात तेव्हा..पाहा गोष्ट मुंबईची!
सध्या उदयराज यांच्यावर उपचार सुरू आहे. घरफोडी, जबरदस्तीने एखाद्याच्या मालकीच्या जागेत घुसणे, हत्येचा प्रयत्न करणे, आदी कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.