नवी मुंबई : सीवूड्स येथील चाणक्य तलावाजवळ कांदळवन कायमचे नष्ट करण्यासाठी ज्वलनशील पदार्थांचा वापर केला जात असल्याने कांदळवन सुकून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सिडको या परिसरातील सर्वात मोठा कांदळवनाचा पट्टा असलेला करावे सर्व्हे नंबर २२ कांदळवन समितीकडे देत नाही त्यामागे हा पट्टा खासगी विकसकाच्या घश्यात घालण्याचा डाव असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. पर्यावरणप्रेमींनी याबाबत पालिका, सिडको व राज्यशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला केला आहे.
टी एस चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे असलेला चाणक्य तलाव हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संरक्षित क्षेत्र आहे. तर पालिकेच्या विकास आराखड्यात कांदळवन आरक्षण हटवण्यात आले असून त्या ठिकाणी वारंवार कांदळवनावर घाला घालण्याचे प्रकार घडत आहेत.
हेही वाचा – कळंबोलीत चार किलो गांजासह एकाला अटक
१४.७४ हेक्टर क्षेत्र व्यापलेला चाणक्य तलाव आणि त्याच्या आजूबाजूचे खारफुटीचे क्षेत्र सिडकोच्या अधिपत्याखाली येते. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोला आपल्या ताब्यातील सर्व खारफुटी प्रदेश वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देऊनही, सिडकोने जाणीवपूर्वक संपूर्ण ठाणे खाडी हस्तांतरण करण्यास टाळाटाळ करत असून खासगी विकसकांच्या घशात घालून कोटींचा फायदा मिळवण्याच्या प्रकारामुळे सिडकोचाच चाणक्य तलाव बुजवण्याचा छुपा प्रकार असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे.
एकीकडे कांदळवन तोडल्यानंतर काही दिवसानंतर हीच कांदळवन पुन्हा वाढताना व त्यांना पालवी फुटल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ज्या कांदळवनाच्या मुळाशी ज्वलनशील रसायने टाकून ती जाळली गेली आहेत. त्यामुळे ही कांदळवने पुन्हा वाढत नसल्याचे चित्र असल्याने याविरोधात पर्यावरणप्रेमींचा सिडको विरोधात प्रचंड संताप आहे.
हेही वाचा – बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
नवी मुंबईतील एनआरआय संकुलाला लागून असलेला एक मोठा पट्टा राज्य शासनाने सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून दिला आहे. त्यानंतर येथे एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचे काम चालू झाले आहे. याच चाणक्य परिसरात वारंवार छुप्या पद्धतीने खारफुटी तोडून टाकण्याचे प्रकार सुरु आहेत. तर दुसरीकडे पालिकेनेही या जमिनीवर टाकलेले पाणथळ आरक्षण हटवल्याने आधीच पर्यावरणप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला आहे.
कांदळवन वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना दुसरीकडे रात्रीच्या अंधारात खारफुटी तोडली जाते. सिडको, पालिका, कांदळवन विभाग दुर्लक्ष करत असून यामध्ये सिडकोच कांदळवन नष्ट करण्याकडे टपले आहे. या पर्यावरण रक्षणाबाबत कुचराई केली जात आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमी सुनील अग्रवाल यांनी केला.