नवी मुंबई : संपूर्ण राज्यभरात छत्रपती शिवरायांबाबतच्या विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून  विविध वक्तव्यांमुळे आरोपांची राळ उडत असतानाच दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नेरुळ सेक्टर १ येथील छत्रपती शिवजी महाराज चौकाचा कायापालट करण्यात आला असून आकर्षक मेघडंबरीमध्ये शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा साकारण्यासाठी ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेरुळ येथील चौकात  शिवरायांच्या मावळ्यांचा आकर्षक देखावाही साकारण्यात आला आहे. नेरुळ सेक्टर १ येथील शिवाजी चौकाचे रूपडे पालटले असून  मावळ्यांच्या देखाव्याचे सर्वांना आकर्षण आहे. शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे काम वेगाने होत असून येथील सर्व कामांसाठी जवळजवळ एक कोटीपेक्षा अधिकचा खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे या चौकाचे रूपडे अधिक आकर्षक होणार आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : रासायनिक कंपनीला भीषण आग

नवी मुंबई शहरात वाशी येथील शिवाजी चौक या परिसरास आकर्षक असे रूप देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती असलेल्या शिवाजी चौकाची आगळी ओळख निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे नेरुळ सेक्टर १ येथील शिवाजी चौकातही मेघडंबरीमध्ये शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा साकारला जाणार आहे. तसेच या चौकाची सर्व बाजूंनी रुंदी कमी केली गेली आहे. त्यामुळे सुरळीतपणे वाहतूक होण्यासही मदत होत आहे. तसेच याच परिसरात विविध शैक्षणिक संस्था तसेच डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम असल्याने या परिसराला अधिकच आकर्षक रूप येणार आहे.

या चौकाला शिवाजी चौक व या चौकात असलेल्या देखण्या मेघडंबरीत सिंहासनारूढ पुतळा साकारण्याची मागणी माजी महापौर जयवंत सुतार  तसेच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे देवनाथ म्हात्रे यांनी केली होती. नवी मुंबई नियोजित शहर असून या शहराला आकर्षक व देखणे रूप देण्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. नेरुळ परिसरात असलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियममुळे व त्या ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल  स्पर्धांमुळे या विभागाला महत्त्व असून शिवरायांच्या पुतळ्यामुळे या विभागाला व चौकाला अधिक देखणे व आकर्षक रूप मिळणार आहे. पुतळा बसविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी महामार्गांवर अवजड वाहनांना बंदी

नेरुळ येथील मेघडंबरी असताना सातत्याने त्या ठिकाणी तमाम महाराष्ट्राचे व देशाचे श्रद्धास्थान असलेल्या शिवरायांचा आकर्षक व देखणा सिंहासानारूढ पुतळा उभारण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. माजी महापौर जयवंत सुतार यांनीही यासाठी प्रयत्न केले होते. पालिकेने येथील चौकात मावळ्यांचा देखावा साकारला असून फक्त पुतळा बसविण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून  काही दिवसांत मिळेल असा विश्वास आहे.

– देवनाथ म्हात्रे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट

नेरुळ येथील शिवाजी चौकात पालिकेच्या वतीने काम सुरू असून मेघडंबरीत शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. त्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळताच पुतळ्याचे कामही तात्काळ  पूर्ण करण्यात येईल.

– पंढरीनाथ चौडे, अभियंता, नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awaiting thane collector permission statue of shivaji at shivaji chowk in nerul ysh