उरण तालुक्यात अनिष्ट रूढी व परंपरांविरोधात जनजागरण करण्यासाठी अनिष्ट प्रथा आणि व्यसनविरोधी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीची रविवारी जेएनपीटी कामगार वसाहतीत बैठक झाली. या बैठकीत लग्न, साखरपुडा आदी समारंभावरील वाढता खर्च, त्यातील दारू मटणाच्या मांडवप्रथा आदींना विरोध करीत साध्या व पारंपरिक पद्धतीने लग्न करून त्यातून वाचणारा पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्याचे आवाहन या संस्थेच्या जनजागरणातून केले जाणार आहे.
वाढत्या धनसंपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी सध्या अनावश्यक खर्चाने लग्न समारंभ साजरे केले जात आहेत. आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसणाऱ्यांकडून याचे अनुकरण होऊ लागल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे लग्न, साखरपुडा यावरील अनावश्यक खर्च टाळून हे विधी पारंपरिक पद्धतीने करण्यात यावेत अशी भूमिका वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या समितीने घेतल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली आहे. यासाठी समाजातील तरुण आणि उच्चशिक्षित मंडळींनी पुढे येण्याचे आवाहन समितीचे सल्लागार भूषण पाटील यांनी केले आहे. येत्या काळात सुरू होणाऱ्या नव्या लग्नसराईपासून जनजागरणाचे काम करण्यात येणार आहे. त्याकरिता समितीने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यातून प्रबोधनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या घरी लग्न ठरले असेल तेथे जाऊन संबंधितांना साधेपणाने लग्न करण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा