पावसाने दडी मारल्याने उरण परिसरात विविध प्रकारच्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. तापाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही भीती दूर करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षतांची माहिती देण्यासाठी उरणमध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सोमवारी उरणच्या तहसीलदारांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन हे आदेश दिले आहेत.
उरणमध्ये स्वाइन फ्लूने दगावलेल्यांची संख्या दोन वर गेली आहे. उरणमधील एका व्यक्तीचा तापाने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शेजाऱ्यांनी आपली घरेच सोडण्याचा प्रकार घडला आहे. साथीच्या आजाराचे गैरसमज पसरविले जात असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न उरणच्या आरोग्य विभागाकडून केला जात असल्याची माहिती आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक आर. सी. गावंड यांनी दिली आहे. याकरिता हजारो पत्रके छापण्यात आली आहेत. त्याचे वाटप गावोगावी जाऊन आरोग्यसेवक करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांनी आपल्या  परिसरात पाणी साचू देऊ नये, ताप आल्यास कोणती खबरदारी घ्यावी. तसेच रोगांवर उपाय करण्याऐवजी आपल्या परिसरात रोग पसरविणारे डास तयार होऊ नयेत यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. त्याकरिता ग्रामपंचायतींचे सहकार्य घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर यासाठी सर्व स्तरातील विभागांची मदत घ्या मात्र तालुक्यातील तापाची साथ रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन तहसीलदार नितीन चव्हाण यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा