नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी या मध्यवर्ती उपनगरातील ३९० डेरेदार झाडे विकासाच्या नावाखाली तोडण्याचे बेत महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत आखले जात असताना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी या निर्णयाविरोधात ट्वीटहल्ला चढवत अशी झाडे कापणे म्हणजे पाप ठरेल अशी भूमिका घेत या प्रकरणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना साद घातली. प्रशासकीय राजवटीत ठाण्यातून नवी मुंबई महापालिकेचा कारभार हाकणारे शिवसेनेतील बडे नेते या उड्डाणपुलासाठी आग्रही असल्याची चर्चा जोरात  आहे. आव्हाडांनी या प्रकरणात शिवसेनेवर कुरघोडीची संधी साधल्याची चर्चा आहे. 

पामबीच मार्गाशी संलग्न असलेल्या रस्त्यावर तीन किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल उभारण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने एनसीसी कन्स्ट्क्र्शन नामक ठेकेदाराला ३६३ कोटी रुपयांचे काम बहाल केले आहे. महापालिकेच्या प्रस्तावानुसार महात्मा फुले जंक्शन-अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपूल प्रकल्पासाठी ३८४ झाडे स्थलांतरीत तर सहा वृक्ष कापले जाणार आहेत. या वृक्षतोडीची महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला इतकी घाई झाली होती की सात दिवसांच्या आता या प्रकरणी आक्षेप नोंदविण्याचे आवाहन सुरुवातीला करण्यात आले होते.

 याबाबत फार गाजावाजा होऊ नये यासाठी वृत्तपत्रात जाहिरात न देता रस्त्यांवरील झाडांवरच नोटिसा चिकटवण्याचे प्रतापही या विभागाने केले होते. शहरातील काही पर्यावरण संस्था आणि लोकप्रतिनिधींनी यासंबंधी आवाज उठवताच महापालिकेने हरकती नोंदविण्यास मुदतवाढ देत २० जून पर्यत ही प्रक्रिया पुढे ढकलली आहे. या उड्डाणपुलाच्या व्यवहार्यतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना ठाण्यातील काही बडय़ा नेत्यांचा आग्रहामुळे महापालिका प्रशासनाने हे काम पुढे रेटल्याची चर्चाही सुरू आहे. अतिशय रुंद असलेल्या या मार्गालगत वाहनांचे सुटे भाग विकणारी दुकाने तसेच काही वाणिज्य संकुलाची अस्थापनांची वाहने रस्त्याचा अर्धा भाग अडवून उभी असतात. वाहतूक पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई होत नाही. त्यामुळे ३०० ते ५०० मीटरच्या पट्टय़ात काही ठिकाणी वाहनकोंडी होत असते. असे असताना कोणत्याही नव्या आरेखनाचा विचार न करता थेट ३९१ झाडांचा बळी देत महापालिकेच्या अभियंता विभागाने उड्डाणपुलाचा प्रकल्प पुढे रेटला आहे.

Story img Loader