नवी मुंबई : गुरुवर्य़ ह.भ.प बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर यांचे नेरुळ येथील श्री हरी वरदा सेक्टर १८ येथे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात ह.भ.प बाबा महाराज सातारकर तसेच त्यांच्या दोन मुली ह.भ.प भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर तसेच नातवंडे ह.भ.प चिन्मय महाराज, प्रियदर्शनी भट्ट्ड असून रुक्मिणी सातारकर यांच्या निधनामुळे सातारकर फड परंपरेतील व वारकरी संप्रदाय परंपरेतील लाखो जणांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्या वारकरी संप्रदायात बाबा महाराज सातारकर यांच्यासमवेत वारकरी संप्रदाय परंपरा वाढवण्यासाठी अग्रणी होत्या. त्यांनी खाद्यसंस्कृतीबाबतही आवड होती. त्यांनी त्याबाबत लेखन करुन पुस्तकही लिहले होते. समस्त वारकरी संप्रदायाच्या प्रसारासाठी त्या नेहमी अग्रणी असायच्या. त्यांच्यावर नेरुळ सेक्टर ४ येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. टाळ मृदंगाच्या तालावर हरिनामाचा जयघोष करत मोठ्या संख्येने वारकरी अंतयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी नवी मुंबईतील विविध राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक व वारकरी संप्रदाय परिवारातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.