नवी मुंबई : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांचा जागर करण्याची परंपरा नवी मुंबई महापालिकेने यंदाही कायम ठेवली आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरू केलेला हा जागर यावर्षी नव्या रूपात नवी मुंबईकरांपुढे असणार आहे. ‘बाबासाहेबांची समाजाप्रती असणारी समानता, न्याय, शिक्षणाविषयीचा दूरदृष्टीकोन, समाजातील उपेक्षितता, मुक्ती आणि जाणीव याबाबतचे विचार अशा विविध विषयांवर वैचारिक मंथन करत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर नवी मुंबईतील ऐरोली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकात केला जाणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविले जातात. यंदा महोत्सवापुर्वीच्या पंधरवड्यात ‘जागर’ हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित विविध व्याख्याने, संवाद पार पडणार आहेत. हे कार्यक्रम बुधवार, २ एप्रिल पासून रविवार १३ एप्रिल पर्यंत दररोज सायंकाळी नवी मुंबईतील ऐरोली येथील सेक्टर १५ जवळील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पार पडणार आहेत.

नवी मुंबईतील ऐरोली येथील सेक्टर १५ येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकात बाबासाहेबांचा जीवनप्रवास दाखविणारे दुर्मिळ छायाचित्र संग्रहालय, आभासी चित्रप्रणालीव्दारे (Holographic Presentation) बाबासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी विशेष कक्ष, ध्यानकेंद्र अशा विविध सुविधा तसेच आधुनिक ‘ई लायब्ररी’ सह ग्रंथालय आहे. ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार या स्मारकातून व्हावा यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेने याठिकाणी विविध व्याख्याने पार पडली आहेत. त्याच अंतर्गत जागर हा कार्यक्रम राबवला जात आहे.

यामध्ये बुधवार, २ एप्रिल रोजी व्याख्याते डॉ. हरीश वानखेडे यांचे ‘सामाजिक न्याय आणि समानता’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर, शुक्रवार, ४ एप्रिलला साहित्यिक, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे हे ‘युवकांचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर संवाद साधणार आहेत. रविवार, ६ एप्रिल रोजी लोकप्रिय कवी, व्याख्याते अरूण म्हात्रे यांचे ‘प्रिय भिमास…’ हे कविता आणि गीत सादरीकरण होणार आहे. त्यांच्याबरोबर गंधार जाधव आणि गाथा जाधव-आयगोळे यांचाही सहभाग असणार आहे. मंगळवार, ८ एप्रिल रोजी व्याख्याते प्रा. हर्षद भोसले यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाविषयीचा दूरदृष्टीकोन’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे. तर गुरूवार, १० एप्रिल रोजी अभिनेत्री छाया कदम यांचा जीवनप्रवास उलगडणारी मुलाखत होणार आहे. तर शुक्रवार, ११ एप्रिलला प्रा.मृदुल निळे यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजातील उपेक्षितता, मुक्ती आणि जाणीव याबाबतचे विचार’ या विषयावरील व्याख्यान असणार आहे. तर या कार्यक्रमाच्या शेवटच्यादिवशी रविवार, १३ एप्रिलला विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजविणारे युवकांचा ‘भिमा तुझ्या जन्मामुळे…’ या शिर्षकांतर्गत संवाद कार्यक्रम असणार आहे. दररोज सायंकाळी ऐरोली सेक्टर १५ येथील नवी मुंबई महापालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात हे कार्यक्रम पार पडणार आहेत.