लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : शहराच्या अंतर्गत भागात असलेल्या बहुतांश एनएमएमटी बस थांब्यांची दुरवस्था झालेली असून अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाश्यांकडून केला जात आहे. दिसण्यास चकाचक मात्र सदोष रचना असल्याने ऊन आणि पावसापासून बचाव तर होतच नव्हता आता तर बसण्याचीही सोय बहुतांश बस थांब्यांवर नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम असलेली शहर वाहतूक सेवा अर्थात नवी मुंबई परिवहन उपक्रमही अनेक बाबतीत अन्य शहर वाहतूक उपक्रमाच्या तुलनेत सरस असल्याचे सांगत स्वत:च पाठ थोपटून घेतात. मात्र शहरातील बहुतांश बस ठाण्यांच्या निवाऱ्याचे तीनतेरा वाजले आहेत. मनपाच्या परिमंडळ दोन म्हणजेच कोपरखैरणे ते दिघा येथील बस शेल्टरची सर्वात जास्त दुरवस्था झाली आहे. परिमंडळ दोनमध्ये दुर्लक्ष केले जाते, असा आरोप एका निवृत्त एन.एम.एम.टी. कर्मचाऱ्याने केला आहे. वाशी कोपरखैरणे रस्त्यावर काही ठिकाणी आमदार निधीतून बांधलेले प्रवासी निवारे असल्याने प्रवासी एन.एम.एम.टी. बस शेल्टरऐवजी येथे बसची वाट पाहत थांबतात. बसण्याच्या ठिकाणचे पत्रे काढून नेले आहेत. टेकून बसण्यासाठी लावण्यात आलेला पत्रा नाहीसा झालेला आहे. तर अंतर्गत भागात बस शेल्टरची अवस्था दयनीय झाली आहे. बस शेल्टरवरील असे साहित्य बहुतांश वेळा भंगारचोर रोज थोडे थोडे करून काढून नेतात. मात्र याबाबत एन.एम.एम.टी. प्रशासन पोलीस ठाण्यात कधीच गुन्हे नोंद करीत नाही, अशी माहिती एन.एम.एम.टी. च्या एका कर्मचाऱ्याने दिली.
आणखी वाचा-लोकप्रतिनिधींच्या घरांसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया, सिडकोची जाहिरात प्रसिद्ध
शहरातील सर्वच बस थांबे अर्थात शेल्टरची पाहणी केली जात आहे. गरजेनुसार त्याची दुरुस्ती वा नवीन थांबे लावण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने पाहणी केली जात आहे. -योगेश कडुसकर, एन.एम.एम.टी. व्यवस्थापक
अनेक वर्षे बस शेल्टर खराब
अनेक वर्षांपासून बस शेल्टर खराब अवस्थेत आहेत. यात ठाणे-बेलापूर मार्गावरील बस थांबे रात्री अंधारात असल्याने वेश्या, किन्नरांचा वावर तसेच साखळी चोरी, महिलांची छेडछाड असे प्रकार होत असतात. घणसोली नाका, तळवली, गोठिवली या बस थांब्यांच्या समोर उड्डाणपूल असल्याने सर्व बस थांबे पूर्ण अंधारात असतात. उड्डाणपुलावर व्यवस्थित रोषणाई मात्र खाली अंधार अशी परिस्थिती असते. अंधार पडल्यावर एकट्या दुकट्या व्यक्तीला भीती वाटते, अशी माहिती प्रसाद कुमार या प्रवाशाने दिली.