उरण : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि देशातील मोठ्या मच्छीमार बंदराला जोडणाऱ्या उरण ते करंजा मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. या मार्गाचे दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
हेही वाचा : नवी मुंबई: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी किशोर पाटकर, बंडाच्या हंगामात पक्ष जोडणीचे आव्हान
उरण शहर ते करंजा हा चार किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून उरण ते अलिबाग हा जलमार्ग आहे. तर नव्याने निर्माण झालेल्या करंजा मच्छीमार बंदरात दररोज अनेक वाहने वाहतूक करीत आहेत. मात्र मार्गाच्या मधोमध रस्ता खोदण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी खडी टाकल्याने वाहने त्यात फसून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अशा प्रकारचा अपघात झाल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या मार्गावरील खड्ड्यांमुळे धुळीचाही त्रास सहन करावा लागत आहे. उरण ते करंजा हा मार्ग जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. मात्र त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले आहे. चार किलोमीटर लांबीच्या या मार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीसाठी चार कोटींचा निधी मंजूर झाला असून त्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सा. बां. विभागाचे अतिरिक्त अभियंता नरेश पवार यांनी दिली.