|| संतोष जाधव

सिमेंट काँक्रीटीकरण एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

शीव-पनवेल महामार्गावरील खड्डय़ांपासून या वर्षी वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. ज्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले होते, तेथे काँक्रीटीकरण सुरू असून नवीन वर्षांत प्रवास सुखकर होणार आहे. पावसाळ्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासूनही सुटका मिळणार आहे.

या कामासाठी ६८ कोटी रुपये खर्च केले जाणार असून एप्रिलपर्यंत काम पूर्ण केले जाणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.

महामार्गावरील कळंबोली सर्कल ते मानखुर्द सिग्नल या २२ किमी रस्त्याचे काम २०१० मध्ये करण्यात आले होते. परंतु २०१४ मध्ये कामे अपूर्ण असतानाच या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या पावसाळ्यातच रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यानंतर सातत्याने या महामार्गावर पावसाळ्यात खड्डय़ांमुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. ज्या ठिकाणी काम अर्धवट राहिले होते ते काम आता सुरू करण्यात आले आहे. काँक्रीटीकरणामुळे वाहतुकीचा वेग वाढणार आहे.

ज्या ठिकाणी डांबरीकरण होते तेथे आता काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्याचे काम वेगात सुरू आहे. ठेकेदाराला १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. नवीन वर्षांत एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल.    – किशोर पाटील, कार्यकारी अभियंता, सार्व.बांधकाम विभाग

  • २२ किलोमीटर : कळंबोली सर्कल ते मानखुर्द अंतर.
  • ४.५० किलोमीटर : आता काँक्रीटीकरण होणारे अंतर.
  • ६८ कोटी : कामासाठी येणारा खर्च.

Story img Loader