कार आणि रिक्षा टक्कर; सुदैवाने जीवित हानी नाही
नवी मुंबईचा रत्नहार असा लौकिक असणाऱ्या पामबीच मार्गावर डांबरीकरणाला उत्तम पर्याय ठरणाऱ्या जर्मन तंत्रज्ञानाचे मायक्रो सरफेसिंग कोटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गाला अधिक झळाळी मिळाली आहे. मात्र त्यामुळे भरधाव वेगाने वाहने हाकण्याची प्रवृत्ती वाढीस लागली असून परिणामी अपघात घडू लागले आहेत.
पालिका मुख्यालयाजवळील किल्ले गावठाण ते वाशी ऑरेंज कॉर्नरपर्यंत पामबीच मार्गाची लांबी ९ किलोमीटर असून ताशी ६० किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची परवानगी असलेल्या मार्गावर त्यापेक्षा अधिक वेगाने वाहन चालक गाडी चालवीत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक ठरू लागला आहे. शुक्रवारी सायंकाळी रिक्षा आणि कारची सानपाडा मोराज सर्कल येथे टक्कर झाली. मात्र सुदैवाने या अपघातात कुणीही दगावले नाही.
शुक्रवारी वाशी दिशेने येणारी रिक्षा व मोराज सर्कल येथे नेरुळहून सानपाडा मोराज सर्कलकडे जाणारी आलिशान कार यामध्ये जोरदार धडक झाली. कार तरुण मुलगी चालवत होती तर रिक्षात वयोवृद्ध चालक आणि प्रवासी होते. या अपघातात कारने रिक्षाला जोरदार धडक देत मोराज सर्कलवर सानपाडय़ाच्या दिशेने फरफटत नेले. अपघात झाला तेव्हा वाहतूक पोलीस उपस्थित नव्हते. सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनेचे वृत्त समजताच हजर झाले. कारचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची माहिती सानपाडा पोलिसांनी दिली. २३, ८११ जणांवर या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात शहरात सिग्नल तोडल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.