नवी मुंबई: मुबंई कृषी उत्पन्न फळ बाजारात सध्या कचऱ्याचे साम्राज्य निदर्शनास येत आहे. दररोज कचरा उचला जात नसल्याने याठिकाणी कचरा आणि दुर्गंधी पसरलेली आहे. त्यात पावसाळा सुरू झाल्याने साचलेल्या कचऱ्यामधून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे बाजार आवारातील कचरा दररोज उचलावा अशी मागणी व्यापारी करीत आहेत. पावसामुळे अधिक दुर्गंधी पसरत असल्याने नाक मुठीत धरून बाजारात वावरावे लागते,अशी खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेडून शहरातील सर्व कृषी मंडई, धान्य व फळ, भाजीपाला बाजार इत्यादी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. महापालिका एपीएमसी बाजारातील दुर्गंधीकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजीपाला बाजाराबरोबरच फळ बाजारात ही नाशिवंत माल दाखल होतो. कचऱ्यात सडकी खराब झालेली फळे, पुठ्ठे, गवत इत्यादी कचरा असतो.
हेही वाचा… उरणमध्ये सिडकोच्या नैना विभागाचा अनधिकृत गोदामावर हातोडा
मात्र कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने त्यात पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे नाशिवंत कचऱ्यामुळे अजून दुर्गंधी वाढत आहे. याकडे प्रशासन डोळे झाक केल्याचे निदर्शनास येत आहे. आजूबाजूला गजबजलेला परिसर आहे. वर्दळीचा परिसर असलेल्या बाजारात दररोज शेकडो गाड्या, ग्राहकांची रेलचेल असते. अशा गजबलेल्या परिसरात कचरा साठलेला आहे. कचऱ्याच्या ढिगांनी परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. पावसामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असून साथीचे आजार बळावत आहेत. अशा दूषित वातावरणांकडे दुर्लक्ष केले तर आजराला निमंत्रण देण्यासारखी स्थिती उदभवू शकते. अशा दुर्गंधी वातावरणाने अनेकांना साथीच्या रोगाने ग्रासले आहे.
हेही वाचा… करळ ते सिंगापूर बंदर उड्डाणपुलाचे काम पूर्ण; ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला करणार
साचलेला कचरा आणि पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते आणि साथीच्या रोगांची लागण होते. जवळच परिसरात हॉटेल, अशी छोटी दुकाने आहेत. या कचऱ्यावरील माश्या त्या पदार्थांवर जाऊन बसतात आणि खव्यानांनी तेच पदार्थ खाल्याने त्यांना साथीच्या रोगाला सामोरे जावे लागते. त्यामुळे बाजार परिसरात दररोज कचरा उचलून स्वच्छता ठेवावी अशी मागणी होत आहे.