दूरचित्रवाहिनीवरील ‘मल्हार’ मालिकेचा प्रभाव गेल्या वर्षी गणेशमूर्तीकार आणि भक्तांवर होता. यंदा तो बाजीराव मस्तानीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वर्षी बाजीराव मस्तानी हा चित्रपट गाजल्याने बाजीराव रूपातील गणेशमूर्तीना वाढती मागणी आहे.
तसेच अनेक गणेशभक्त पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती असावी तसेच मूर्तीचे पावित्र्य जपता यावे याकरिता लहान आकारातील मातीच्या लहान मूर्तीना पसंती देत आहेत. यात लालबागच्या राजाच्या रूपातील मूर्तीला अधिक मागणी आहे.
प्रत्येक वर्षी गणेशोत्सवातील वेगळेपण जाणवून येत असते.यात गणेशमूर्तीतील विविधता, या कालावधीत मनोरंजानासाठी वाजविण्यात येणारी गाणी, त्याचप्रमाणे सजावट यात बदल होत असतो. बाजारातही दरवर्षी गणेशभक्तांना आकर्षित करण्यासाठी विविधता असलेल्या गोष्टी आणल्या जातात. यामध्ये मात्र त्यांची आवड महत्त्वाची असते.
त्याच धर्तीवर गणेशमूर्तीचीही मागणी बदलते. मात्र अनेक कुटुंबात पिढय़ान् पिढय़ा एकाच प्रकारच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा कायम आहे. यात नव्या पिढीला रस असल्याने वर्षभरात एखाद्या गाजलेल्या कलाकृती किंवा पात्राच्या रूपातील गणेशमूर्ती तयार करण्याची प्रथाही रुजू झाली आहे.
यात साईबाबा, मल्हार रूप आणि या वर्षी बाजीराव पेशवे यांचा समावेश झाला आहे. या मूर्ती बनविताना खास मागणी केली जात असल्याची माहिती चिरनेर येथील मूर्तिकार चौलकर यांनी बोलताना दिली. तसेच मातीच्या मूर्तीना गणेशभक्तांची पसंती असली तरी त्यासाठी लागणाऱ्या कारागिरांची संख्या घटली आहे.
किंबहुना जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. तर उरणच्या बाजारात गेली अनेक वर्षे तयार मूर्ती विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या नरेश भगत यांच्या मते गणेशभक्तांकडून शंभरात ७० जणांकडून मातीच्या लहान आकारातील मूर्तीची मागणी करीत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
तर या वर्षी बाजीराव मस्तानी चित्रपट तरुणाईला पसंत पडल्याने बाजीराव पेशवेच्या रूपातील मूर्तीना अधिक मागणी होत आहे. त्यामुळे या वर्षी चांगला व्यवसाय होणार असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baji rao form ganesh idol has more demand
Show comments