बँक ऑफ बडोदा दरोडय़ाचा उलगडा हिवाळी अधिवेशनापूर्वी व्हावा यासाठी नवी मुंबई पोलिसांनी अनेक क्लृप्त्या लढवल्याची चर्चा आहे. आरोपींना बोलते करण्यासाठी खेकडय़ांचा वापर करण्यात आल्याचे समजते. उलवा येथून आणलेले जिवंत खेकडे नांग्या काढून आरोपींच्या अंगावर सोडण्यात आले होते. त्यांच्या भीतीने आरोपींनी पोलिसांना माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी मुंबई पोलिसांनी १० पथके तयार केली आणि सर्व वरिष्ठांनी त्यांचे नेतृत्व केले. दरोडेखोरांनी मागे सोडलेल्या काही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्य़ाची उकल केली. मोठय़ा दरोडय़ात पैशांची वाटणी किंवा आपसातील मतभेदांमुळे उलगडा होत असल्याचा पोलिसांचा पूर्वानुभव आहे. पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी त्यासाठी स्वंतत्र नियंत्रण कक्ष निर्माण करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे एका गुप्त जागेवरून पोलीस दिवस रात्र मागोवा घेत होते. त्यांनी दरोडेखोरांच्या वाहनावर लक्ष ठेवले होते. ते घाटकोपरहून गोव्याच्या दिशेने निघाले असताना पोलिसांनी वाशी टोल नाक्यावर त्यांना अटक केली. त्यानंतर ह्य़ा चोरीचा उलगडा करणे पोलिसांना शक्य झाले.
आरोपींकडे असलेल्या मोबाइल क्रमांकांमुळे इतर चोरांचा माग काढणे पोलिसांना शक्य झाल्याचे समजते. यात एका आरोपीच्या नातेवाईकांकडून सोने कुठे लपवले आहे हे वदवून घेण्यासाठी खेकडे थेरपीचा वापर केल्याचेही कळते. त्यासाठी उलवा येथून जिवंत खेकडे आणून त्यांच्या अंगावर सोडण्यात आले होते. त्याचप्रमाणे एका आरोपीला कुटुंबाला अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर त्याने सर्व सांगण्याची तयारी दर्शवली. त्याच्या मागणीनुसार त्याला मद्यप्राशन व बिर्याणी देखील आणून देण्यात आल्याचे सांगितले जाते. त्याने सांगितलेली हकीगत दुसऱ्या आरोपींनी सांगितलेल्या घटनाक्रमाशी जुळवूनच पोलिसांनी त्याच्या माहितीवर विश्वास ठेवला. ही संपूर्ण टोळी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या नावावर विविध पोलिस ठाण्यात ३०-४० गुन्हे दाखल असल्याचे समजते. पोलिस या टोळीवर मोक्का लावण्याच्या तयारीत आहेत. या गुन्ह्य़ातील केवळ ५० टक्के ऐवज जप्त करण्यात आला आहे.
यातील आणखी चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांनाही एक किलो सोने देण्यात आल्याने त्यांचा माग काढणे महत्त्वाचे ठरणार आहे.