नवी मुंबई : घर, कंपनी अथवा अन्य कारणांच्या साठी भूखंड खरेदी करताना पूर्ण सावधानता बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा फसवणूक होण्याची जास्त शक्यता आहे. असाच प्रकार नवी मुंबईत घडला असून तब्बल २ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक झाली असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पॅक्स पॉलिसिन्थ प्रा. लि.या कंपनीचे संचालक अशोक नारायण पठारे, सुषमा नारायण पठारे, जगदीश परवेश बाटलीवाला, परवेश मिनुचर असे यातील आरोपींची नावे आहेत . नेरुळ येथे राहणारे असिफ चौधरी यांनी उद्योगासाठी एमआयडीसीतील जागा हवी होती. जागा शोधत असताना अशोक पठारे व अन्य आरोपी संपर्कात आले. सर्व आरोपींनी संगनमत करून असिफ यांना जागा दाखवल्या . त्या पैकी महापे एमआयडीसीतील भूखंड क्रमांक डब्ल्यु १७९ आणि ए ३४ हे भूखंड असिफ याना चांगले वाटल्याने दोन्ही भूखंडचा व्यवहार ठरला. या दोन्ही भूखंडासाठी सुरवातीला २ कोटी १० लाख असिफ यांनी दिले. भूखंड नावावर झाल्यावर पुढील प्रक्रिया पार पाडण्याचे ठरले.
आणखी वाचा-नेरूळ येथे इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार
मात्र भूखंड दिलेल्या वेळेत नावावर करण्यात आले नाहीत. तसेच पैसेही परत मिळत नाहीत हे लक्षात आल्यावर असिफ यांनी तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. या तक्रार अर्जाची शहानिशा करून पॅक्स पॉलिसिन्थ प्रा. लि.या कंपनीचे संचालक अशोक नारायण पठारे, सुषमा नारायण पठारे, जगदीश परवेश बाटलीवाला, परवेश मिनुचर यांच्या विरोधात संगनमत करणे, कट रचणे, विश्वासघात करणे, आर्थिक फसवणूक करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी हे करीत आहेत.